मुंबई-गोवा महामार्गाची गडकरींनी दिली नवी तारीख; म्हणाले, सर्व खटले मिटले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 14:52 IST2025-04-16T13:56:49+5:302025-04-16T14:52:30+5:30

मुंबई-गोवा हायवेचे बांधकाम येत्या जूनपर्यंत पूर्ण होईल असे गडकरी म्हणाले आहेत. जवळपास गेली १६-१७ वर्षे या महामार्गाचे कामच सुरु आहे.

Gadkari gives new date for Mumbai-Goa highway work complete; says all cases settled... | मुंबई-गोवा महामार्गाची गडकरींनी दिली नवी तारीख; म्हणाले, सर्व खटले मिटले...

मुंबई-गोवा महामार्गाची गडकरींनी दिली नवी तारीख; म्हणाले, सर्व खटले मिटले...

गेली कित्येक वर्षे नितीन गडकरी केंद्रात मंत्री आहेत, ते पण रस्ते परिवाहन आणि राजमार्ग खात्याचे, तरीही त्यांना महाराष्ट्रातील मुंबई-गोवा महामार्ग काही केल्या पूर्ण करता आलेला नाहीय, अशी टीका विरोधकांकडून होते. आता त्यांनी हा महामार्ग पूर्ण होण्याची नवीन तारीख जाहीर केली आहे. यामुळे या महामार्गाबाबत आशा सोडलेल्या कोकणवासियांनी पुन्हा आशा करण्यास सुरुवात केली आहे. 

मुंबई-गोवा हायवेचे बांधकाम येत्या जूनपर्यंत पूर्ण होईल असे गडकरी म्हणाले आहेत. जवळपास गेली १६-१७ वर्षे या महामार्गाचे कामच सुरु आहे. राजकारण्यांचे हस्तक्षेप, कोर्टात गेलेले खटले, कंत्राटदार पळून जाणे अशी अनेक विघ्ने या महामार्गावर कोसळली आहेत. कुठे एकेरी, तर कुठे दोन्ही बाजुला खड्डेच खड्डे अशी परिस्थिती या महामार्गाची आहे. ज्याला कंबरदुखी, मानदुखी असेल त्याची कंबरदुखी मानदुखी गायब होईल आणि ज्याची नाही त्याला कंबरदुखी मानदुखी सुरु होईल असा हा महामार्ग आहे. 

अनेकांचे या महामार्गाने बळी घेतलेले आहेत. अनेक गावांतील कर्ते पुरुष या महामार्गाने संपविले आहेत. प्रशासन फक्त पंचनामे आणि गुन्हे यापुढे काहीही करत नाहीय, अशी कोकणातील या रस्त्याची परिस्थिती आहे. काही वर्षांपूर्वी गडकरींनीच हवाई पाहणी केली होती. आता त्यांनी या महामार्गाकडे लक्ष दिले असून येत्या जूनपर्यंत हा हायवे तयार होईल असा त्यांनी दावा केला आहे. 

सोमवारी मुंबईतील दादर परिसरात 'अमर हिंद मंडळ'ने आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत गडकरी यांनी ही घोषणा केली. केंद्र सरकार नवीन टोल धोरणावर काम करत आहे, ते लवकरच लागू केले जाणार आहे. यामुळे टोलनाके हटविले जातील, असे ते म्हणाले. पुढील दोन वर्षांत भारतातील रस्ते अमेरिकेपेक्षा चांगले होतील, असेही ते म्हणाले. 

मुंबई आणि गोवा दरम्यान बांधण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गामुळे या दोन्ही ठिकाणांमधील प्रवासाचा वेळ बराच कमी होईल. हा महामार्ग पूर्ण करण्यात अनेक अडथळे आले. जमीन अधिग्रहण, न्यायालयीन खटले आणि भरपाईशी संबंधित गुंतागुंतीवरून भावांमध्ये असलेल्या अंतर्गत कलहामुळे काम अडकलेले होते. आता या सर्व समस्या सोडवल्या गेल्या आहेत आणि कामाला वेग आला आहे, असे ते म्हणाले. येत्या जूनपर्यंत हा रस्ता १०० टक्के पूर्ण होईल असे त्यांना सांगितले. 

Web Title: Gadkari gives new date for Mumbai-Goa highway work complete; says all cases settled...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.