नर्सिंगच्या १५४० विद्यार्थिनींचे भवितव्य अधांतरी
By Admin | Updated: November 1, 2016 19:01 IST2016-11-01T19:01:33+5:302016-11-01T19:01:33+5:30
निकषात बसत नसलेल्या राज्यातील ७७ नर्सिंग स्कूलची मान्यता भारतीय परिचर्या परिषदेने एका आदेशाने रद्द केली. त्यामुळे या स्कूलमध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या १५४० विद्यार्थिनीं

नर्सिंगच्या १५४० विद्यार्थिनींचे भवितव्य अधांतरी
>ऑनलाइन लोकमत/विलास गावंडे
यवतमाळ, दि. 01 - निकषात बसत नसलेल्या राज्यातील ७७ नर्सिंग स्कूलची मान्यता भारतीय परिचर्या परिषदेने एका आदेशाने रद्द केली. त्यामुळे या स्कूलमध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या १५४० विद्यार्थिनींचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी आहे. निकषात बसत नसतानाही प्रवेश देऊन या महाविद्यालयांनी खेळ चालविला, अशी भावना विद्यार्थिनींमध्ये निर्माण झाली आहे.
भारतीय परिचर्या परिषद दिल्लीकडून प्रत्येक तीन वर्षाने नर्सिंग स्कूलची तपासणी केली जाते. शिवाय या नर्सिंग स्कूलला प्रथम वर्ष प्रवेशासाठी दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. नवीन शैक्षणिक सत्रासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. या दृष्टीने आवश्यक ती तपासणी भारतीय परिचर्या परिषदेकडून झाली. यात काही नर्सिंग स्कूलने निकष पूर्ण केले नसल्याचे स्पष्ट झाले. सुसज्ज प्रयोगशाळा, आवश्यक तेवढे शिक्षक ही निकषे प्रामुख्याने तपासली गेली. याबाबी पूर्ण न केलेल्या स्कूलची मान्यता रद्द करण्यात आली आहे. महाराष्टÑ परिचर्या परिषदेने २९ आॅक्टोबर रोजी मान्यता रद्द झालेल्या महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे.
परिचर्या प्रशिक्षण प्रसविका या दोन वर्षांच्या आणि सामान्य परिचर्या प्रशिक्षण या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी १ ते ३ आॅक्टोबरपर्यंत नर्सिंग स्कूलने प्रवेश प्रक्रिया राबविली. आवश्यक ती सर्व प्रक्रिया विद्यार्थिनींकडून करून घेण्यात आली. प्रत्येक स्कूलमध्ये २० विद्यार्थिनींना प्रवेश दिला गेला. आता ७७ नर्सिंग स्कूलची मान्यता रद्द झाली आहे. या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या १५४० विद्यार्थिनींना इतर ठिकाणच्या प्रवेशाची दारे बंद झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या या अभ्यासक्रमातील भवितव्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. १२ वी नंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. अर्धेअधिक शैक्षणिक सत्र संपले असल्याने इतर अभ्यासक्रमालाही या विद्यार्थिनी मुकणार आहे. या परिस्थितीत काय तोडगा निघतो, याकडे लक्ष लागले आहे.
मान्यता रद्द झालेले नर्सिंग स्कूल
वर्धा चार, भंडारा तीन, यवतमाळ तीन, बुलडाणा तीन, गडचिरोली दोन, गोंदिया तीन, चंद्रपूर एक, अमरावती एक, अकोला एक, नांदेड दोन, अहमदनगर आठ, हिंगोली तीन, परभणी सात, औरंगाबाद सहा, मुंबई एक, नाशिक तीन, सांगली तीन, बीड चार, ठाणे एक, रत्नागिरी एक, लातूर पाच, उस्मानाबाद एक, नंदूरबार दोन, सोलापूर दोन.