"राज्यातील रस्ते दुरुस्तीसाठी निधी कमी पडणार नाही, पण...", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 10:23 PM2021-09-29T22:23:17+5:302021-09-29T22:24:21+5:30

Uddhav Thackeray : राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील खड्ड्यांच्या दुरुस्ती व उपाययोजनांचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत आढावा घेतला.

"Funds for road repairs in the state will not be reduced, but ...", Chief Minister Uddhav Thackeray warned | "राज्यातील रस्ते दुरुस्तीसाठी निधी कमी पडणार नाही, पण...", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

"राज्यातील रस्ते दुरुस्तीसाठी निधी कमी पडणार नाही, पण...", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

Next

मुंबई : राज्यातील रस्त्यांची कामे दर्जेदार करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यासह या कामांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश देऊन रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल, मात्र निधीचा विनियोग योग्यप्रकारे न करणाऱ्या आणि गुणवत्ता न राखणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिला.

राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील खड्ड्यांच्या दुरुस्ती व उपाययोजनांचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत आढावा घेतला. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह कोकण, नाशिक, मराठवाडा, पुणे आदी विभागांचे मुख्य अभियंते, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अभियंते उपस्थित होते.

राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम लवकर मार्गी लावण्याची सूचना देऊन मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे बुजविताना गुणवत्तेवर भर देण्याचे निर्देश दिले. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाची गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

...तर कामचुकार अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई होणार
संपूर्ण रस्त्यांची कामे ही दर्जेदार झाली पाहिजेत, त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, रस्त्यांच्या कामात गुणवत्तेवर सर्वोच्च भर देण्याबरोबरच रस्त्यांच्या कामासाठी कृती आराखडा तयार करावा, निधीची कमतरता पडू देणार नाही मात्र निधीचा विनियोग योग्य प्रकारे केला नाही आणि कामात गुणवत्तेवर भर दिला गेला नाही तर कामचुकार अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याच्या सूचनाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

रस्त्यांसाठी ऑक्टोबर अखेर ५० टक्के निधी वितरित करणार - उपमुख्यमंत्री
अतिवृष्टी आणि पावसामुळे राज्यातील रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली असून या रस्त्यांच्या कामासाठी अर्थसंकल्पिय तरतुदीपैकी ५० टक्के निधी ऑक्टोबरअखेर वितरित करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. रस्त्यांच्या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही मात्र रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर कोणतीही तडजोड करणार नसल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सर्व मुख्य अभियंत्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा दररोज आढावा घेऊन व्यक्तिशः लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. राज्यातील जास्त पावसाच्या भागात डांबराऐवजी कॉंक्रिटचे रस्ते तयार केल्यास दर्जेदार आणि खड्डेविरहीत रस्ते तयार होतील यादृष्टीने भविष्यात निर्णय घेण्याचे सूतोवाचही अजित पवार यांनी यावेळी केले.
 

Web Title: "Funds for road repairs in the state will not be reduced, but ...", Chief Minister Uddhav Thackeray warned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.