कुंभमेळ्यासाठी निधी द्या अन्यथा भाविकांवर निर्बंध
By Admin | Updated: November 8, 2014 03:49 IST2014-11-08T03:49:33+5:302014-11-08T03:49:33+5:30
पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याकरिता गोदावरी नदी स्वच्छ करण्यासाठी राज्य शासनाने व येथील महापालिकेने मागणी केलेला निधी केंद्र शासनाने तात्काळ द्यावा

कुंभमेळ्यासाठी निधी द्या अन्यथा भाविकांवर निर्बंध
मुंबई : पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याकरिता गोदावरी नदी स्वच्छ करण्यासाठी राज्य शासनाने व येथील महापालिकेने मागणी केलेला निधी केंद्र शासनाने तात्काळ द्यावा अन्यथा येथे येण्याऱ्या भाविकांना निर्बंध घालावे लागतील, असा इशारा शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिला़
दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा होतो़ २००३मध्ये येथे कुंभमेळा झाला होता व आता पुढील वर्षी येथे हा मेळा होणार आहे़ कुंभमेळ्याला देशभरातील भाविक या नदीत आंघोळ करतात व येथील पाणी तीर्थ म्हणून घेऊन जातात़ मात्र या नदीत सांडपाणी व औद्योगिक कंपन्यांचे प्रदूषित पाणी सोडले जाते़ यामुळे ही नदी प्रदूषित झाली आहे़
परिणामी पुढील वर्षीच्या कुंभमेळ्यासाठी येथे येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याला याने धोका होऊ शकतो़ तसेच याच नदीच्या पाण्यावर नाशिक जिल्ह्यातील शेती अवलंबून आहे़ तेव्हा या नदीत सांडपाणी व कंपन्यांचे पाणी सोडण्यास मज्जाव करावा व ही नदी स्वच्छ करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका राजेश मधुकर पंडित व इतरांनी अॅड़ प्रवर्तक पाठक यांच्यामार्फत दाखल केली आहे़
तर कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने या नदीजवळील भूखंड ताब्यात घेऊन तेथे पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी करणारी जनहित याचिका हिंदू जनजागृती समितीने अॅड़ वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्यामार्फत दाखल केली आहे़
या याचिकांवर न्या़ अभय ओक व न्या़ अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर एकत्रित सुनावणी झाली़ त्यात नाशिक महापालिका व राज्य शासनाने ही नदी स्वच्छ करण्यासाठी व येथे पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी केंद्राकडे सुमारे २ हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे़ पण अजून हा निधी मिळाला नसल्याचे सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ (प्रतिनिधी)