धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 07:09 IST2025-09-22T07:09:25+5:302025-09-22T07:09:39+5:30
माहूरगड, सप्तश्रृंगी गड, कोल्हापूर ते तुळजापूर विविध उत्सवाचे रंग

धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
एक जिल्हा-एक उत्पादन : तुळजापूरमध्ये यंदाच्या महोत्सवात 'एक जिल्हा-एक उत्पादन' या संकल्पनेवर विविध स्टॉल्स उभारले जाणार आहेत. यामुळे स्थानिक कारागिरांना व्यासपीठ मिळेल. भेटीचा सोहळा कधी ? : अंबाबाई व त्र्यंबोलीदेवी भेटीचा सोहळा व कोहळा फोडण्याचा विधी ललिता पंचमीला होईल. अष्टमीला पालखीची नगरप्रदक्षिणा, नवमीला खंडेपूजन व दसऱ्याला रथारूढ रूपातील पूजा बांधण्यात येईल.
विविध कलांचा जागर : माहूरगडावरील उत्सवात सनई वादन, भक्ती संगीत, कीर्तन, कविसंमेलन, गोंधळ नृत्य, जोगवा, दांडिया, भारुड, नाटिका, आदी विविध ललित कला सादर केल्या जाणार आहेत. खासगी वाहतूक बंद : नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर ६ ऑक्टोबरपर्यंत नांदुरी ते सप्तश्रुंगी गड खासगी वाहतूक बंद राहील.
कोल्हापूरची अंबाबाई देवी यंदा महाविद्या स्वरूपात
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सोमवारी घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. यावर्षी आश्विन शुद्ध तृतीया या तिथीत वृद्धी झाल्याने उत्सव दहा दिवस साजरा होईल. या काळात अंबाबाईची पूजा दशमहाविद्यांपैकी सात स्वरूपात बांधण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी ६.३० वाजता अंबाबाई देवीची नित्य पूजाभिषेक होईल.
तुळजाभवानीच्या चरणी पारंपरिक उत्सवांचे रंग
कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सवासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून, यंदा पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. नवरात्रोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत.
रेणुकामातेच्या गजरासाठी माहूरगड सज्ज
माहूर गडावरील श्री रेणुका देवी संस्थान येथे शारदीय नवरात्र महोत्सव २ ऑक्टोबरपर्यंत होईल. सोमवारी पहिली माळ असून, माहुरगड उत्सवासाठी सज्ज झाला. वैदिक महापूजा, वेद घोष, घटस्थापना, श्री दुर्गा शतचंडी पाठ, चतुर्वेद पारायण, छबीना महाआरती, श्री दुर्गा सप्तशती शतचंडी पाठ, छबिना मिरवणूक यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
सप्तशृंगी देवी दर्शनासाठी व्हीआयपीला कात्री
नवरात्रौत्सवानिमित्त सकाळी सातला जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या हस्ते श्री सप्तशृंग देवीची पंचामृत महापूजा होईल. त्यानंतर घटस्थापना होईल. भक्तांच्या सोयीसाठी प्रशासनाने यंदा व्हीआयपी पासेसला कात्री लावली. नवरात्रोत्सवानिमित्त सुमारे २० लाख भाविक हजेरी लावण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.