मैत्री करावी की दुश्मनी, हा एकच सवाल आहे..!
By अतुल कुलकर्णी | Updated: August 3, 2025 10:18 IST2025-08-03T10:18:58+5:302025-08-03T10:18:58+5:30
सगळ्यांनी आपल्याला मित्रवर्य देवेंद्रजी असे लिहिले आहे. त्यामुळे पुनरावृत्ती न करता थेट पत्राचा मसूदा आणि लिहिणाऱ्याचे नाव देत आहे.

मैत्री करावी की दुश्मनी, हा एकच सवाल आहे..!
अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
प्रिय देवेंद्रजी,
नमस्कार...
आज आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस. त्यानिमित्ताने काही नेत्यांच्या मनात तुमच्याविषयीच्या खूप चांगल्या भावना उचंबळून आल्या. त्यांनी त्या आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायला सांगितल्या आहेत. आम्ही फक्त पोस्टमनच्या भूमिकेत आहोत. आमची भावना तुम्ही समजून घ्याल याची खात्री आहे. सगळ्यांनी आपल्याला मित्रवर्य देवेंद्रजी असे लिहिले आहे. त्यामुळे पुनरावृत्ती न करता थेट पत्राचा मसूदा आणि लिहिणाऱ्याचे नाव देत आहे.
टू बी ऑर नॉट टू बी... मैत्री करावी की दुश्मनी,
हा एकच सवाल आहे..!
दादूसोबत हातात हात घालून
निवडणुकांना सामोरं जावं की
तुमच्याशी हातमिळवणी करावी आणि
माझ्या मदतीने ठाणेकरांचा पत्ता कट करण्याचं
तुमचं इप्सित साध्य होऊ द्यावं...
टोटल कन्फ्युजन निर्माण करावं आणि
दादूसोबत दाखवावा एकदाचा करिष्मा
ठाकरे ‘ब्रँड नेम’चा..? हा एकच प्रश्न छळतो आहे,
की पुन्हा एकदा तुम्हाला एकत्र भेटून
लावावा कायमचा सोक्षमोक्ष ‘दाढी’चा..?
टू बी ऑर नॉट टू बी... मैत्री करावी की दुश्मनी,
हा एकच सवाल आहे..!
तुमचाच, राज
टू बी ऑर नॉट टू बी... मैत्री करावी की दुश्मनी,
हा एकच सवाल आहे..!
खेळू द्यावी आपल्या सवंगड्यांना रम्मी
की आपणही काकांसारखं पत्ते पिसून टाकावेत
उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची घेऊन जगावं आनंदानं,
की फेकून द्यावं पक्षाचं ओझं आणि
करावा शेवट सगळ्यांचा एकाच प्रहारानं...
पक्षाचा, घड्याळाचा आणि सगळ्यांचा...
घ्याव्या पांघरून कमळाच्या पाकळ्या अंगभर,
पण मग मिळेल का जागृतीचा किनारा...
त्यातून निद्रेलाही पुन्हा
स्वप्न पडू लागली मुख्यमंत्रिपदाची तर..?
की, आयुष्यभर उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची घेऊन
बसावं गपगुमान तुम्ही
दिल्लीला जाण्याची प्रतीक्षा करत..?
टू बी ऑर नॉट टू बी... मैत्री करावी की दुश्मनी,
हा एकच सवाल आहे..!
तुमचाच, अजित
टू बी ऑर नॉट टू बी... मैत्री करावी की दुश्मनी,
हा एकच सवाल आहे..!
माझेच सवंगडी माझे दुश्मन बनू पाहताना
धनुष्याचं ओझं किती काळ सहन करायचं..?
किती काळ सहन करायचं हे दोन नंबरचं पद..?
मी जवळचा की अजित जास्त जवळचा?
या प्रश्नानं झोप उडवलेली असताना
आता एकच सवाल छळतो आहे...
हे मित्रांचा मित्र देवेंद्र, उर्फ देवा भाऊ
कधी जाता दिल्लीला मुंबई सोडून...
म्हणजे मला पुन्हा एकदा
‘वर्षा’त न्हाऊन निघता येईल, अनोख्या आनंदाने...
तुमचाच, एकनाथ
टू बी ऑर नॉट टू बी... मैत्री करावी की दुश्मनी,
हा एकच सवाल आहे..!
हे देवेंद्रा, तू इतका कठोर का झालास?
एका बाजूला आम्ही ज्यांना मोठं केलं
तेच आमच्यावर उलटले आणि दुसऱ्या बाजूला
तुला साथ देणाऱ्या आम्हालाही तु विसरतोस...
मग या नुसत्या मशालीचे टेंभे घेऊन
आम्ही कोणाकडे मैत्रीचा हात पुढे करायचा?
दादरचं शिवतीर्थ, मातोश्री आणि वर्षा
असा त्रिवेणी संगम करायचा सोडून
कशासाठी करायचा नागपूर, बारामती, ठाणे...
असा द्राविडी प्राणायाम?
अजूनही वेळ गेली नाही...
टू बी ऑर नॉट टू बी... मैत्री करावी की दुश्मनी,
हा एकच सवाल आहे..!
तुमचाच, उद्धव
मैत्री दिनानिमित्त ही पत्र असल्यामुळे किती गांभीर्याने घ्यायची हा निर्णय तुम्ही स्वतः घ्यावा...
तुमचाच, बाबूराव