कॅम्पा कोलावर कारवाईचा मार्ग मोकळा, रहिवाशांचा विरोध मावळला
By Admin | Updated: June 22, 2014 18:07 IST2014-06-22T17:27:02+5:302014-06-22T18:07:22+5:30
कॅम्पाकोलावासियांचा विरोध मावळल्याने गेल्या दीड वर्षांपासून रेंगाळलेल्या कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

कॅम्पा कोलावर कारवाईचा मार्ग मोकळा, रहिवाशांचा विरोध मावळला
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २२- 'गेल्या १८ महिन्यांपासून आम्ही आमचे घर वाचवण्यासाठी संघर्ष करत आहोत.सोसायटीतील सर्वच रहिवासी मानसिक तणावाखाली असून हे सर्व बघवत नाही. आता आम्ही आणखी लढणार नाही असे सांगत कॅम्पाकोलावासियांनी महापालिकेच्या कारवाईला सामोरे जायची तयारी दर्शवली आहे. महापालिकेच्या पथकाला कारवाईसाठी प्रवेशद्वार खुले असून त्यांनी कधीही कारवाई करावे असे रहिवाशांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेचे पथक अवैध बांधकामांवर कारवाई करण्यासाठी कॅम्पाकोलात जात आहे. मात्र रहिवाशांच्या विरोधामुळे महापालिकेला कारवाई करता येत नव्हती. या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी आ. बाळा नांदगावकर, शायना एन सी आणि इमारतीतील रहिवाशांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीनंतर रहिवाशांचा विरोध मावळला आहे. 'गेली १८ महिने आम्ही सिस्टमविरोधात लढत होतो. आता आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच संघर्ष करु' असे इमारतीतील रहिवासी आशिष जालान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्री चव्हाण यांनी आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे असे त्यांनी स्पष्ट केले. महापालिका अधिका-यांची माफी मागत जालान म्हणाले, आम्हाला त्यांच्या कामात हस्तक्षेप करायचा नव्हता किंवा सुप्रीम कोर्टाचाही अवमान करायचा नव्हता. आम्हाला घर वाचवायचे होते. पण हा संघर्ष आता थांबवण्याची गरज आहे. महापालिकेला कारवाई करण्यासाठी आमचे प्रवेशद्वार खुले आहेत. मात्र त्यांनी उद्यापासून कारवाई केल्यास बरे होईल.
पूनर्बांधणी, वाढीव एफएसआय असे तीन ते चार पर्याय आमच्याकडे असून यापैकी कोणता पर्याय आम्हाला स्वीकारता येईल यासााठी महापालिका व सरकारचा सल्ला घेऊ असेही त्यांनी नमूद केले. रहिवाशांचा विरोध मावळल्याने आता महापालिका इमारतीतील १०२ अवैध बांधकामांचे वीज, पाणी व गॅस कनेक्शन तोडेल. यात दिवस लागतील. त्यांनतर इमारतीवर प्रत्यक्ष हातोडा मारण्याची कारवाई सुरु होईल. मात्र कधी हातोडा मारला जाईल हे अद्याप ठरलेले नाही.