‘चौथरा प्रवेश’ पुन्हा रोखला!

By Admin | Updated: April 3, 2016 03:52 IST2016-04-03T03:52:47+5:302016-04-03T03:52:47+5:30

मंदिरांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही प्रवेश मिळणे हा मूलभूत हक्क असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतरही शनी शिंगणापूर येथे भूमाता ब्रिगेडच्या महिलांना

'Fourth entrance' again stopped! | ‘चौथरा प्रवेश’ पुन्हा रोखला!

‘चौथरा प्रवेश’ पुन्हा रोखला!

शिंगणापूर (नगर) : मंदिरांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही प्रवेश मिळणे हा मूलभूत हक्क असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतरही शनी शिंगणापूर येथे भूमाता ब्रिगेडच्या महिलांना संतप्त गावकऱ्यांनी शनिवारी चौथऱ्यावर प्रवेश करण्यापासून पुन्हा रोखले. गावकऱ्यांनी आंदोलक महिलांना धक्काबुक्की केली तर चौथरा प्रवेशासाठी आग्रही असलेल्या माजी आमदाराला मारहाण झाली. त्यातून मोठा तणाव निर्माण झाल्याने अखेर पोलिसांनीच आंदोलकांना दर्शनाविना गावाबाहेर काढले.
धार्मिक ठिकाणी पुरुषांप्रमाणे महिलांच्या दर्शनाची व्यवस्था करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य शासनाला दिल्यानंतर भूमाता महिला ब्रिगेडच्या तृप्ती देसाई त्यांच्या सहकाऱ्यांसह दुपारी शिंगणापुरात दाखल झाल्या. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे माजी आमदार मुरकुटे हेसुद्धा १०-१२ महिलांसमवेत शिंगणापुरात आले. मात्र परंपरा तोडून आम्ही कोणालाही चौथऱ्यावर जाऊ देणार नाही, अशी देवस्थानची भूमिका असल्याचे कोषाध्यक्ष योगेश बानकर, विश्वस्त दीपक दरंदले यांनी मुरकुटे यांना सांगितले. काही वेळाने तृप्ती देसाई मंदिर परिसरात आल्या. तेव्हा चौथऱ्याखालूनच दर्शन घेण्याचे त्यांना स्थानिक महिला व पोलिसांनी सांगितले. मात्र, देसाई चौथऱ्यावर जाण्याबाबत ठाम होत्या. त्यातून गोंधळ होऊन देसाई यांना धक्काबुक्की झाली, तर मुरकुटे यांना मारहाण झाली. त्यात मुरकुटे यांचे कपडे फाटले. दुपारी ३च्या सुमारास देसाई व महिला आंदोलकांना पोलिसांनी मंदिर परिसरातून बाहेर आणले. त्यानंतर आधी त्यांना नगरकडे व संध्याकाळी सव्वापाच वाजता पुण्याकडे रवाना करण्यात आले.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मला मारहाण झाली, मी राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचे मुरकुटे यांनी पत्रकारांना सांगितले. (प्रतिनिधी)


प्रसिद्धीसाठी हाणामाऱ्या करू नका - मुख्यमंत्री
सनातन हिंदू संस्कृतीत जात, लिंग असा भेद कधीच सांगितलेला नसल्यामुळे महिलांना मंदिरात प्रवेश नाकारणे योग्य होणार नसल्याची भूमिका राज्य सरकारने उच्च न्यायालयात घेतल्यामुळे येणाऱ्या काळात महिलांना मंदिरात प्रवेश देण्यापासून रोखले जाणार नाही, त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली जाईल, असे स्पष्ट करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धीसाठी महिलांच्या मंदिराचा प्रश्न उभा करून हाणामाऱ्या करू नका, असे आवाहन नाशिक येथील जाहीर सभेत केले.

पंकजा मुंडेंनी घेतले शनिदर्शन
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे शनी चौथऱ्यावर जाऊन तेल वाहिले व शनिदर्शन घेतले. येथील चौथऱ्यावर प्रवेश करून शनीला तेल वाहून दर्शन घेणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. त्यांच्यासोबत आष्टीचे आ. भीमराव धोंडे, माजी आ. दगडू बडे आदी उपस्थित होते.

उच्च न्यायालयाचा आदेश मिळाल्यानंतरही राज्य सरकारने महिलांना दर्शन घेण्यापासून अटकाव केला. पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांविरुद्ध तक्रार दाखल करू. न्यायालयाच्या निर्णयाची प्रत मला मिळाली आहे.
- तृप्ती देसाई, भूमाता महिला ब्रिगेड

चित्रा वाघ यांचा दौरा रद्द
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी कायदा- सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेऊन शिंगणापुरात जाणे रद्द केले.

महिलांना संरक्षण द्या
महिलांना दर्शन व पूजा करण्याची कायद्यानेच परवानगी दिल्याने देवस्थान समिती व ग्रामस्थांनी विरोधाची भूमिका घेणे चुकीचे आहे़ दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांना शासनाने संरक्षण द्यावे.
- अविनाश पाटील, राज्य कार्याध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

Web Title: 'Fourth entrance' again stopped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.