चार महिन्यांची वारी!
By Admin | Updated: January 30, 2015 03:53 IST2015-01-30T03:53:33+5:302015-01-30T03:53:33+5:30
‘पंढरीची वारी’ हा विषय धार्मिक असल्याचा समज होता़ त्यामुळे संकल्पना निवड समितीने त्यातील अनेक बारकावे तपासले

चार महिन्यांची वारी!
नवी दिल्ली : ‘पंढरीची वारी’ हा विषय धार्मिक असल्याचा समज होता़ त्यामुळे संकल्पना निवड समितीने त्यातील अनेक बारकावे तपासले आणि शेवटी तिथे नवस बोलला जात नाही, पशुहत्या केली जात नाही, शारीरिक पीडा देणारे कोणतेही विधी नसतात. वारकरी हा पांडुरंगाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊनही आनंदी होतो असा हा निरागस दृष्टिकोन असलेला भलामोठा सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राला लाभला आहे, असे ध्यानात येताच या चित्ररथाला मान्यता दिली. चार महिन्यांपूर्वी ही संकल्पना संरक्षण विभागाने मान्य केली.
तत्कालीन सांस्कृतिक कार्य संचालक संजय पाटील, सहसंचालक मनोज सानप, कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे, नृत्यदिग्दर्शक संतोष भांगरे यांनी संरक्षण विभागाच्या चित्ररथ निवड समितीने ही संकल्पना मंजूर करावी यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या चित्ररथाची बांधणी व कलावंतांची रंगीत तालीम संरक्षण विभागाच्या रंगशाळेत सुरू होती़ त्या वेळी व अगदी २३ तारखेच्या रंगीत पथसंचलनाच्या वेळी नवे संचालक अजय अंबेकर यांनी अनेक बारकाव्यांवर काम केले. गैरसमज व समज या परीक्षेतून गेलेला हा चित्ररथ आज पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून राज्याचे वैशिष्ट्य दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची दीर्घ परंपरा आहे. ‘लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे शताब्दीवर्ष’, ‘हापूस आंबा’, ‘बापू स्मृती’ या चित्ररथांनी १९९३ ते १९९५ अशी सलग तीन वर्षे महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते.
सर्वप्रथम १९७१मध्ये वारली दिंडीच्या संकल्पनेवर आधारित चित्ररथ राजपथावर सादर झाला. त्यानंतर १९८०मध्ये ‘शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक’ व १९८३मध्ये ‘बैल पोळा’या संकल्पनेवरील चित्ररथाने प्रथम पारितोषिक पटकावले होते. ‘भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महाराष्ट्राचे योगदान’ या चित्ररथास द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले होते. १९८८मध्ये ‘लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासिक खटला’ला द्वितीय, २००७मध्ये ‘जेजुरीचा खंडेराय’ला तृतीय तर २००९मध्ये ‘धनगर’ या चित्ररथास द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. (विशेष प्रतिनिधी)