"चार वर्गमित्र, विचारवंत आणि बॉस"; माझ्यापेक्षा पूनावालांचे कर्तृत्व मोठे - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 12:29 PM2021-11-26T12:29:31+5:302021-11-26T12:31:52+5:30

यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी २५ नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडून वेगवेगळ्या क्षेत्रात राज्यात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना सन्मानित केले जाते.

"Four Classmates, Thinkers and Boss"; Poonawala's deed are greater than mine says Sharad Pawar | "चार वर्गमित्र, विचारवंत आणि बॉस"; माझ्यापेक्षा पूनावालांचे कर्तृत्व मोठे - शरद पवार

"चार वर्गमित्र, विचारवंत आणि बॉस"; माझ्यापेक्षा पूनावालांचे कर्तृत्व मोठे - शरद पवार

googlenewsNext

मुंबई  : सिरम इन्स्टिट्यूट ही जागतिक पातळीवरील संस्था आहे. जगात जन्मलेल्या पाच मुलांपैकी तिघांना सिरमची लस दिली जाते. इतके मोठे काम करणारी दुसरी संस्था अथवा व्यक्ती देशात असेल असे मला वाटत नाही. व्यक्तीच्या कर्तृत्वाचे आपण मोजमाप करत नाही याचे उदाहरण म्हणजे सायरस पूनावाला. भारत सरकारने त्यांना पद्मश्री दिला आणि मला पद्मविभूषण; पण माझ्यापेक्षा त्यांचे कर्तृत्व निश्चित मोठे आहे. त्यामुळे खूप वेळेला भारत सरकारच्या पातळीवर निर्णय घेण्यात कमी पडतो याचे पूनावाला आणि सिरम इन्स्टिट्यूट हे उत्तम उदाहरण असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी २५ नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडून वेगवेगळ्या क्षेत्रात राज्यात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना सन्मानित केले जाते. गुरुवारी शरद पवार यांच्या हस्ते सिरम इन्स्टिट्यूटला राज्य पातळीवरील पुरस्कार देण्यात आला. सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शाळीग्राम यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते. या सोहळ्यास शरद पवारांसह ज्येष्ठ  शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, खासदार सुप्रिया सुळे, अरुण गुजराथी, हेमंत टकले, शरद काळे उपस्थित होते. 

शरद पवार म्हणाले की, सिरमचा जन्म झाला तेव्हापासून या संस्थेसोबत माझा संपर्क आहे. सायरस पूनावाला यांच्या वडिलांचे पुण्यात फर्निचरचे दुकान होते. पूनावालांचे शिक्षण पण बी. कॉम.पर्यंत झालेले. ज्याचा संशोधनाशी काहीही संबंध नव्हता; पण एखादे काम हातात घेतल्यावर अतिशय बारकाईने लक्ष केंद्रित करण्याचा त्यांचा स्वभाव होता. सायरस पूनावाला यांना घोड्याचा नाद होता. चांगले घोडे सांभाळणे, वेळप्रसंगी त्यांची रेसदेखील ते लावायचे. त्यानंतर घोड्याच्या शेपटीच्या रक्तापासून त्यांनी व्हॅक्सिन बनवली आणि तिथून त्यांची सुरुवात झाली, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

चार वर्गमित्र, विचारवंत आणि बॉस
इथे दोन लोक बसले आहेत एक अग्रवाल आणि दुसरे अरुण गुजराथी. आम्ही सगळे एका वर्गात होतो. आमच्या वर्गात हुशार विद्यार्थी हे दोघेच होते. अग्रवाल अतिरिक्त मुख्य सचिव पदापर्यंत पोहोचले, तर गुजराथी चार्टर्ड अकाऊंट झाले. मी आणि सायरस मात्र कसेबसे पास झालो; पण परिस्थिती अशी झाली की, आमच्यातल्या विचारवंतांचे आम्ही दोघे बॉस झालो. हा गमतीचा भाग आहे, असा किस्सा पवार यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.
 

Web Title: "Four Classmates, Thinkers and Boss"; Poonawala's deed are greater than mine says Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.