ठळक मुद्देमहाराष्ट्रातल्या तीनही टप्प्यांमधले मतदान आटोपणार युरोप सहलीवर जाऊन त्यांनी वैचारीक दुटप्पीपणा दाखवून दिल्याची चर्चा साहित्य वर्तुळात सुरु
पुणे : सोशल मीडियातून, जाहीर भाषणांमधून लोकशाही बद्दलची कळकळ व्यक्त करणाऱ्या, मतदानाबद्दलची आस्था मांडणाऱ्या माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची लोकशाहीबद्दलची तळमळ पोकळ असल्याचे दिसून आले आहे. तरुणांनी मतदान करावे, यासाठी अथकपणे भाषणे ठोकणाऱ्या देशमुखांचे शब्द म्हणजे केवळ ‘बापुडा वारा’ असावा, असे त्यांच्या ताज्या ‘फेसबुक पोस्ट’वरुन स्पष्ट झाले आहे. या ‘तोंडपाटिलकी’ विरुद्ध नेटीझन्सनी देशमुखांना झोडपून काढले आहे. ‘राजा तू चुकत आहेस,’ या शब्दात बडोद्याच्या साहित्य संमेलनातून सरकारला खडे बोल सुनावणारे देशमुख स्वत: मात्र सपत्नीक तीन आठवड्यांच्या युरोप दौऱ्यावर गेले आहेत. यामुळे लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्य, दर पाच वर्षांनी एकदाच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतल्या मतदानाला देशमुख स्वत:च गैरहजर राहण्याची भीती निर्माण झाली आहे. अर्थात स्वत: मतदानाला दांडी मारणाऱ्या देशमुखांनी अलिकडच्या काही दिवसांमध्ये मतदार जागृतीसाठी भाषणे ‘ठोकून’ आणि लेख ‘पाडून’ अल्प प्रायश्चित घेण्याचाही प्रयत्न बहुधा केला असावा. आपल्या अधिकृत ‘फेसबुक वॉल’वर २६ मार्च रोजी देशमुख लिहितात, ‘‘संविधानावर व तिच्या तत्वज्ञानावर अढळ विश्वास असणारा एक जागरुक भारतीय नागरिक म्हणून केवळ मत देणे एवढेच माझे काम आहे, असे मी मानत नाही तर लोकशाही बळकट होण्यासाठी चांगले उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे, असे मानणारा नागरिक आहे.’’ मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन युरोपच्या दिशेने उड्डाण करण्यापुर्वीची छायाचित्रे देशमुख यांनी ९ एप्रिलच्या मध्यरात्री त्यांच्या ‘फेसबुक वॉल’वर प्रसिद्ध केली आहेत. युरोपची सहल तीन आठवड्यांची असल्याचेही त्यांनी यात नमूद केले आहे. त्यामुळे देशमुख ३० एप्रिल रोजी परतणार असल्याचे यावरुन दिसते. तोपर्यंत महाराष्ट्रातल्या तीनही टप्प्यांमधले मतदान आटोपणार आहे. ...............लोका सांगी ब्रह्मज्ञान...लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीकांत देशमुख मतदारांमध्ये जागृती करीत होते. तरुणांचा ‘युवा जाहीरनामा’ त्यांनी नुकताच प्रकाशित केला. त्याहीवेळी त्यांनी मतदान करण्याबाबतचे आग्रही सल्ले युवकांना दिले होते. ............देशमुखांची नौटंकी?यामुळेच ‘‘मतदान नाही करणार?? मग लोकशाही वर कस काय बोलणार? ?? का फक्त नौटंकीच करायची...’’ असा सवाल ‘नेटीझन्स’नी देशमुखांना विचारला आहे. देशमुखांनी ‘निवडणूक आणि मी’ या शीर्षकांतर्गत सहा भागांमध्ये निवडणुकीविषयीची आपली भूमिका, उमेदवारांना दिलेला पाठींबा आणि त्या बद्दलचे विश्लेषण या विषयी ‘फेसबुक’वर लिहिले. अनेक वाचकांनी त्यावर ‘लाईक्स’चे शिक्के मारले. मात्र स्वत: तीन आठवड्यांच्या युरोप सहलीवर जाऊन त्यांनी वैचारीक दुटप्पीपणा दाखवून दिल्याची चर्चा साहित्य वर्तुळात सुरु झाली आहे. ज्येष्ठ भाष्यकार रामदास फुटाणे यांनीही ‘मतदान करुन जाणे योग्य होते,’ अशी अपेक्षा ‘फेसबुक’वर व्यक्त केली आहे.