रत्नागिरी : ‘महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी देणार नाही’, असे विधान राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी केले आहे. मंत्री राणे यांचे विधान हे भेदभाव आणि द्वेषपूर्ण असल्याने उद्धवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत मंत्री राणे यांना नोटीस पाठवली आहे. हे विधान मागे घ्या अन्यथा राज्यपालांकडे याबाबत तक्रार केली जाईल, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.भाजपच्या एका सभेत मंत्री नितेश राणे यांनी आता फक्त महायुतीच्याच सरपंचांना राज्याचा निधी मिळणार. महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी देणार नाही, असे विधान केले हाेते. मंत्रिपदाची शपथ संविधानाच्या कलम १६४ (३) नुसार घेताना ज्या संविधानिक कर्तव्याचे पालन करावे, ती संविधानिक जबाबदारी नितेश राणे पाळत नाहीत, असा आरोप विनायक राऊत यांनी ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत पाठवलेल्या नोटीसमधून केला आहे.मंत्रिपदावरील व्यक्तीने असे भेदभाव व विषमता पसरवणारे, द्वेषपूर्ण विधान करणे घटनाबाह्य आहे. तसेच संविधानाचा आणि लोकांचा अपमान असल्याने ही नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती ॲड. असीम सरोदे यांनी दिली.
विनायक राऊत यांची मंत्री नितेश राणे यांना नोटीस, नेमकं प्रकरण काय.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 13:38 IST