बंडखोरी, पक्षफुटीदरम्यान शिवसेनेला मोठं यश, माजी आमदार शरद पाटील काँग्रेस सोडून सेनेत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 16:46 IST2022-07-12T16:46:18+5:302022-07-12T16:46:55+5:30
Former MLA Sharad Patil: एकीकडे अनेक बड्या आमदारांनी नेतृत्वाविरोधात बंड पुकारले असताना एका जुन्या शिवसैनिकाने मात्र शिवसेनेत घरवापसी केली आहे. शिवसेनेचे धुळे ग्रामीण मतदारसंघातील माजी आमदार आणि सध्या काँग्रेसमधील नेते शरद पाटील यांनी घरवापसी करत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

बंडखोरी, पक्षफुटीदरम्यान शिवसेनेला मोठं यश, माजी आमदार शरद पाटील काँग्रेस सोडून सेनेत दाखल
मुंबई - गेल्या महिन्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आमदारांनी केलेल्या बंडांमुळे शिवसेनेत फूट पडली आहे. या बंडाळीनंतर अनेक आमदार, कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात सहभागी होत आहेत. त्यामुळे शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. मात्र एकीकडे अनेक बड्या आमदारांनी नेतृत्वाविरोधात बंड पुकारले असताना एका जुन्या शिवसैनिकाने मात्र शिवसेनेत घरवापसी केली आहे. शिवसेनेचे धुळे ग्रामीण मतदारसंघातील माजी आमदार आणि सध्या काँग्रेसमधील नेते शरद पाटील यांनी घरवापसी करत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
मातोश्रीवर झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पाटील यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला. शरद पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे सध्याच्या पडझडीच्या काळात शिवसेनेला धुळे जिल्ह्यात मोठं बळ मिळणार आहे.
शरद पाटील हे २००३ मध्ये काँग्रेसमधून शिवसेनेत आले होते. त्यानंतर त्यांनी धुळे ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचा पाया भक्कम केला होता. दरम्यान, २०१९ मध्ये उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, पक्षफुटीमुळे शिवसेना अडचणीत असताना शरद पाटील यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्याने उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली होती. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेतून गेल्यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.