माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची मागील टर्मची आमदारकी सुप्रीम कोर्टाकडून रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 00:48 IST2020-07-15T00:47:40+5:302020-07-15T00:48:09+5:30
सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अर्जुन खोतकर विजयी ठरले. त्यांच्या निवडीस आव्हान देणारी याचिका काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती.

माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची मागील टर्मची आमदारकी सुप्रीम कोर्टाकडून रद्द
औरंगाबाद : शिवसेना नेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशन दाखल करण्याची निर्धारित वेळ संपल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाल्याने त्यांची आमदारकी रद्द करण्याचा औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले.
सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अर्जुन खोतकर विजयी ठरले. त्यांच्या निवडीस आव्हान देणारी याचिका काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करताना खोतकर यांनी फार्म क्रमांक ९ (नमुना नंबर २६) सोबत मूळ शपथपत्र जोडले होते. मात्र वैयक्तिक माहितीत अवलंबितांची माहिती दिली नव्हती. शिवाय, त्यांनी पक्षाचा एबी अर्जही जोडला नव्हता आणि अर्ज क्रमांक ९,१० व ४४ मध्ये त्रुटी होत्या. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी मुदतीनंतर अर्ज दाखल केला, परंतु अर्जावर वेळ मात्र मुदतीआधीची नोंदवली. इलेक्ट्रॅनिक पुरावा ग्राह्य धरण्यास हरकत नसते परंतु त्या उपकरणाचे नियंत्रण कुणाकडे आहे, याकडे दूर्लक्ष करता येणार नाही, असे मत नोंदवत न्यायमूर्ती ता. वि. नलावडे यांनी सदस्यत्व रद्द केले होते.