एन. डी. सर कालवश; लढवय्या नेत्याच्या निधनानं महाराष्ट्र शोकाकुल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 10:09 AM2022-01-18T10:09:43+5:302022-01-18T10:11:55+5:30

महाराष्ट्राच्या, विशेषत: १९५० नंतरच्या महाराष्ट्राच्या इतिहासाचा, राजकारणाचा, सामाजिक चळवळीचा, शेतकरी आंदोलनाचा, शिक्षणविषयक आंदोलनाचा विचार ‘एन. डी. पाटील’ या नावाशिवाय पुराच होऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय जीवनाचे असे एकही क्षेत्र नाही, जेथे त्यांचे नाव सापडणार नाही.

Former Maharashtra Minister Leader Of Working People ND Patil Dies | एन. डी. सर कालवश; लढवय्या नेत्याच्या निधनानं महाराष्ट्र शोकाकुल

एन. डी. सर कालवश; लढवय्या नेत्याच्या निधनानं महाराष्ट्र शोकाकुल

googlenewsNext

महावितरण कंपनीच्या विरोधातील वीज बिलातील पोकळ थकबाकीच्या आंदोलनापर्यंत एन. डी. सरांचा सहभाग ही प्रत्येक आंदोलनाची नैतिक ताकद राहिली. प्रामुख्याने गिरणी कामगारांचा लढा, गोवामुक्ती संघर्ष, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, एक गाव एक पाणवठा, भूमिहीनांसाठी संघर्ष, शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावा यासाठी केलले लढे, कापूस एकाधिकार योजना, महागाई आणि उपासमारविरोधी आंदोलन, धरणग्रस्तांचे, प्रकल्पग्रस्तांचे लढे, मराठवाडा नामांतर आंदोलन, एन्रॉन हटाव आंदोलन, हमीभावासाठी शेगाव ते नागपूर विधानसभेवर पायी काढलेली दिंडी, रायगड जिल्ह्यातील सेझ विरोधातील लढा, कोल्हापुरातील टोलविरोधी लढा, सांगली जिल्ह्यातील तासगाव कारखान्याचा लढा असे अनेक लढे त्यांनी लढवले व सामान्य शेतकऱ्यांच्या बळावर ते जिंकून दाखवले.

महाराष्ट्राचा आवाज हरपला
शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे. महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे. एन. डी. पाटील हे राज्याच्या पुरोगामी विचारांचे व्यासपीठ होते. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची मशाल त्यांनी शेवटपर्यंत पेटत ठेवली. लढणे आणि संघर्ष करणे 
हेच त्यांचे जीवन होते. बेळगावसह सीमा लढ्यातील प्रत्येक आंदोलनात ते आघाडीवर होते.    - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

निस्वार्थी नेता हरपला
शेतकरी, कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला, जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा, तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता हरपला आहे. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी विधिमंडळातही त्यांनी आवाज उठवत आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले होते. शेतकरी कामगार पक्षाची धुरा निष्ठेने सांभाळणाऱ्या एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची जबाबदारीही त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तितक्याच क्षमतेने पार पाडली.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

चळवळींचे नेतृत्व 
प्रा. एन. डी. पाटील हे जनसामान्य, कष्टकरी, शेतकरी व कामगारांसाठी अतिशय पोटतिडकीने काम करणारे झुंजार नेते होते. कोणताही प्रश्न ते अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडत व त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करत. शिक्षण क्षेत्रात त्यांचे कार्य मोठे होते. अनेक आंदोलने व विधायक चळवळींना त्यांनी नेतृत्व प्रदान केले. 
- भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

लढवय्या कर्तबगार नेता
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोजक्या लढवय्या नेत्यांमध्ये प्रा. एन. डी. पाटील यांचा समावेश आहे. त्यांचा संघर्ष वयाच्या ९३ व्या वर्षापर्यंत सुरूच होता.  वैधानिक मंडळ असो, सामान्यांचे प्रश्न असोत वा  राजकीय पक्षाचे व्यासपीठ, या तिन्ही ठिकाणी कर्तबगारी, कर्तृत्व, चारित्र्य आणि अधिकारवाणीने  वावरू शकणारे प्रा. एन. डी. पाटील हे एकमेव नेते असावेत. ते अल्पकाळ मंत्री होते, पण सामान्य माणसांचा आवाज त्यांनी नेहमीच तडाखेबंद रीतीने गर्जत ठेवला. सीमाप्रश्नाचा लढा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावासाठीची आंदोलने किंवा सिडकोच्या जमिनींचा लढा या सर्व ठिकाणी एन. डी. पाटील अग्रेसर होते. निस्वार्थपणे ते शेतकऱ्यांची बाजू घेऊन कायम लढत राहिले. त्यांना माझी विनम्र आदरांजली.
- विजय दर्डा,  चेअरमन, एडिटाेरियल बोर्ड, लोकमत समूह

१९२९-२०२२
= संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील
= महाराष्ट्राला ओळख : प्रा. एन. डी. पाटील
= कौटुंबिक माहिती : पत्नी सरोज ऊर्फ माई पाटील या शैक्षणिक कामात सक्रिय. मोठा मुलगा सुहास हे अमेरिकेत खासगी कंपनीत मोठ्या अधिकारपदावर. 
= धाकटा मुलगा प्रशांत पाटील हे मुंबईत स्थायिक व बांधकाम व्यावसायिक.
= जन्म : १५ जुलै १९२९, ढवळी (नागाव) जि. सांगली येथील अशिक्षित कुटुंबात.
= शिक्षण : एम. ए (अर्थशास्त्र), पुणे विद्यापीठ १९५५.
= एलएल. बी. (१९६२), पुणे विद्यापीठ.
= अध्यापक कार्य : सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये १९५४ ते १९५७ प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ योजनेचे प्रमुख व रेक्टर. इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे १९६० साली प्राचार्य.
= शैक्षणिक कार्य : शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य- १९६२. विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य १९६५.
= शिवाजी विद्यापीठातील सामाजिक शास्त्र विभागाचे डीन : १९७६-७८
= महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण आयोगाचे सदस्य : १९९१
= रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य : १९५९ पासून आजअखेर.
= रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन : १९९० पासून सलग १८ वर्षे.

राजकीय कार्य
= सन १९४८ला विद्यार्थिदशेत असतानाच शेतकरी कामगार
    पक्षात प्रवेश ते आजतागायत लाल झेंड्याशी एकनिष्ठ.
= १९५७ ला मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस.
= १९६० ते ६६, १९७० ते ७६ व १९७६ ते ८२ अशी
    १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषेदेचे सदस्य.
= १९७८ ते ८० : पुलोद सरकारच्या काळात सहकारमंत्री.
= १९८५ ते १९९० : कोल्हापूर शहर विधानसभा
    मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षातर्फे आमदार.
= १९९९ ते २००२ : महाराष्ट्रातील लोकशाही आघाडी सरकारचे निमंत्रक
= महाराष्ट्र शासनाने सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष

सन्मान व पुरस्कार
= ‘भाई माधवराव बागल’ पुरस्कार - १९९४
= स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाची डी. लिट. - १९९९
= केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बियाणे महामंडळाचे अध्यक्ष : १९९८ ते २०००
= औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाची डी. लिट. - २०००
= परभणीच्या विचारवेध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष - २००१
= शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार - २००२
= कॉ. दत्ता देशमुख स्मृती पुरस्कार : २००३
= कोल्हापुरातील शाहू स्मारक ट्रस्टचा मानाचा ‘शाहू’ पुरस्कार : २००७
= शिवाजी विद्यापीठाची डी. लिट. : २००९

सरांच्या जगण्याचे सार
रॉबर्ट फ्रॉस्ट या इंग्रजी कवीच्या ओळी सरांना खूप आवडायच्या...
‘या निसर्गसंपन्न प्रदेशातून दोन रस्ते निघाले होते. त्यातून कोणत्या रस्त्याने जावे असा प्रश्न माझ्यासमोर होता. त्यापैकी कमी मळलेला रस्ता
मी निवडला आणि निष्ठेने चालत राहिलो... जे काही आज घडलंय ते त्यातूनच...!’

Web Title: Former Maharashtra Minister Leader Of Working People ND Patil Dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.