माजी नगरसेवकाला खंडणीसाठी धमकी
By Admin | Updated: October 16, 2014 05:14 IST2014-10-16T05:14:17+5:302014-10-16T05:14:17+5:30
माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर शेट्टी यांना एक कोटीच्या खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे

माजी नगरसेवकाला खंडणीसाठी धमकी
ठाणे : माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर शेट्टी यांना एक कोटीच्या खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये आलेले शेट्टी यांचा बांधकाम व्यवसाय आहे. ते हिरानंदानी येथे असताना १४ आॅक्टोबर २०१४ रोजी सायंकाळी ६.३० वा.च्या सुमारास एकाने त्यांच्या मोबाइलवर कॉल केला आणि धमकावले. ‘तुझा ४०० ते ५०० कोटींचा प्रोजेक्ट आहे. तू मला एक करोड रुपये दे, नाहीतर तुझी विकेट घेईन,’ अशा शब्दांत त्यांना धमकावण्यात आले. त्यानंतर, पुन्हा याच व्यक्तीने फोन करून ‘एक करोड रुपयांचे काय झाले, नाहीतर दुसऱ्या व्यक्तीचा खून करून तुला त्या केसमध्ये अडकवीन’, अशी धमकी दिली. याप्रकरणी शेट्टी यांनी तातडीने वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे ते तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आले तेव्हाही त्यांना हा फोन आला होता.
शेट्टी यांना कोणी फोन केला, याचा शोध घेण्यात येणार आहे. तसेच त्यांच्याही फोनचा तपशील पडताळण्यात येत आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विजय गोळे यांनी दिली.