ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारी सकाळी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी 'वर्षा' बंगल्यावर दाखल झाले. सुमारे अर्धा तास ;चाललेल्या बैठकीत राज ठाकरे व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात नाशिकमधील पूर, मराठी भाषेला अभिजात दर्जा देणे तसेच मराठी तरूणांना ड्रायव्हिंगचा परवाना अशा विविध मुद्यांवर चर्चा झाली.
आज दुपारी 'कृष्णकुंज' येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यांसंबधी माहिती दिली. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंबंधी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मोठी गाजावाजा केला मात्र अद्याप तसे काही घडलेले नाही. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जेचा भाषा मिळावा यासाठी मनापासून प्रयत्न करावेत, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी मराठीचा मुद्दा पुन्हा उचलून धरत राज्यातील तरूणांनाच ड्रायव्हिंगचा परवाना देण्याची मागणी केली. ज्यांना ड्रायव्हिंग परवाना हवा असेल त्यांना मराठी भाषा येणे बंधनकारक केले पाहिजे, तसेच डोमिसाईल सर्टीफिकेट्सही सक्तीची करावीत, असेही राज म्हणाले.
मुसळधार पावासामुळे नुकताच आलेल्या पुरामुळे नाशिकचे अतोनात नुकसान झाले असून त्याच्या भरपाईकरता काही रकमेची तरतूद राज्याने करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे राज यांनी सांगितले.
आजच्या भेटीदरम्यान राज यांच्यासोबतबाळा नांदगावकर, शिशिर शिंदे आदी मनसे नेतेही उपस्थित होते. या दोघांची गेल्या दोन महिन्यातील ही तिसरी भेट असून यापूर्वी 'नीट' परीक्षेप्रश्नी राज मुख्यमंत्र्यांच्या भेटीस गेले होते. पुढील वर्षी होणा-या मुंबई पालिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण हळूहळू तापत असताना मुख्यमंत्री फडणवीस व राज यांच्या वाढत्या भेटींचे अनेक अर्थ लावले जात आहेत.
आणखी वाचा :