चारा छावणी घोटाळा: महाराष्ट्रातील 'लालू' मोकाट !
By Admin | Updated: July 13, 2016 15:47 IST2016-07-13T15:47:49+5:302016-07-13T15:47:49+5:30
राज्यात २०१३ साली दुष्काळात जनावरांसाठी शासनाने उघडलेल्या चारा छावण्यामध्ये पाच जिल्ह्यात ३०० कोटींचा घोटाळा उघड झाला होता.

चारा छावणी घोटाळा: महाराष्ट्रातील 'लालू' मोकाट !
शिवाजी सुरवसे/ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 13 - राज्यात २०१३ साली दुष्काळात जनावरांसाठी शासनाने उघडलेल्या चारा छावण्यामध्ये पाच जिल्ह्यात ३०० कोटींचा घोटाळा उघड झाला होता. जनहित याचिका दाखल झाली़चौकशी झाली़ काही चारा छावणी चालकांकडून दंड वसूल करण्यात आला. मात्र या चाराछावणी चालकांमध्ये आमदार, कारखानदार आणि बडे नेते असल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी करण्याची टाळाटाळ केली जात आहे. एकीकडे बिहारमध्ये चारा घोटाळ्यात अडकलेले लालू प्रसाद यादव यांना शिक्षा झाली असताना महाराष्ट्रातील लालू मोकाट आहेत. त्यावेळी विरोधात आवाज उठविणारे देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत त्यामुळे ते का गप्पा आहेत असा सवाल जनहित याचिकाकर्ते गोरख घाडगे (सांगोला) यांनी केली आहे.
२०१३ साली राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर आणि बीड या जिल्ह्यात शासनामार्फत चारा छावण्या सुरू केल्या होत्या. कारखानदार आणि राजकारणी व्यक्तींनी या छावण्या चालविण्यासाठी घेतल्या होत्या. तहसीलदार आणि त्या संस्थेबरोबर करार करुन चारा छावणीचालकांना नियम व अटी घालून दिल्या होत्या. मात्र या अटींचा भंग करुन शासनाच्या निधीत मोठा घोटाळा करण्यात आला़ जून २०१३ साली राज्यात तब्बल १२७३ चारा छावण्या होत्या. जनावरांची संख्या बोगस दाखविणे, सीसीटीव्ही न बसविणे, जनावरांना बारकोडिंग न करणे, व्हिडीओ चित्रीकरण न करणे, पुरेशा पाण्याची व्यवस्था न करणे, चारा व पशुखाद्य रेकॉर्ड अद्यावत न ठेवणे, कुंपण तसेच गव्हाणीची सुविधा न देणे, जनावरांचा सावलीची व्यवस्था न देता चारा छावणीधारकांना शासनाचा निधीवर डल्ला मारला़ दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य व्यक्तींची लूट केली़.
या चारा छावण्यावर दोन हजार कोटींहून अधिक खर्च शासनाचा झाला आहे़ एकट्या सांगोला तालुक्यात १०५ छावण्या होत्या यावरच ३०० कोटी खर्च झाले होते. विभागीय आयुक्तांची चारा छावण्याची तपासणी केल्यावर चालकांना १९ कोटींचा दंड करण्यात आला होता. राज्यभरातील छावणी चालकांना १६७ कोटी दंड करण्यात आला होता. काही छावणी चालकांनी हा दंड देखील भरला नाही़. सोलापूर जिल्ह्यातील चारा छावण्यात अनियमितता आढळल्याने १९ कोटी ७९ लाख रक्कम संबंधित छावणी चालकाच्या बिलातून कपात केली आणि पाच छावण्या बंद केल्या होत्या़ सांगली जिल्ह्यातील १६२ छावण्यांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांच्याकडून ९ कोटी ८७ हजार वसूल केले तर तीन छावण्या बंद केल्या होत्या़ सातारा जिल्ह्यातील छावणी चालकांकडून ५ कोटी १४ वसूल केले होते़ बीड जिल्ह्यातील चारा छावणी चालकांकडून ८़१६ कोटी वसूल केले आहेत़
जनहित याचिका क्रमांक १६४/२०१३ नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले असताना शासनाकडून फौजदारीबाबत टाळाटाळ केली जात आहे़ सांगोला पोलीस ठाण्यात भ्रष्टाचारी छावणी चालक पांडूरंग नलावडे यांच्याविरोधात फौजदारी दाखल झाली आता त्याच धर्तीवर पाचही जिल्ह्यातील भ्रष्ट छावणी चालकांवर फौजदारी करण्याची कारवाई करावी अशी मागणी घाडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
तेव्हा विरोधात आता सत्तेत !
चारा छावण्या घोटाळ्यामध्ये अडकलेल्या छावणी चालकांना दंडात्मक कारवाई करा, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी २०१३ साली लक्षवेधी सूचनेद्वारे विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, रामनाथ मोते, अॅड़ आशिष शेलार यांनी विधान परिषदेत यांनी मांडली होती़ यावर मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी उत्तर दिले होते. चौकशी करुन काही जणांनाकडून दंडात्मक वसुलीची कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. घोटाळा झाल्याची कबुली त्यांनी दिली होती मात्र आता कारवाईबाबत शासन, प्रशासनातील अधिकारी टाळाटाळ करीत आहेत़ न्यायालयात देखील तारखावर तारखा पडत असून आजवर ३६ तारखाड पडल्या आहेत़ त्यावेळी विरोधात ओरडणाऱ्यांच्या हातात आता सत्ता आहे त्यामुळे त्यांनी तरी या घोटाळेबाज चारा छावणीचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.
चारा छावण्यांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा डल्ला मारणाऱ्या चारा छावणीचालकांमध्ये आमदार, खासदार, कारखानदार आहेत म्हणूनच मुख्यमंत्री त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस करीत नाहीत. २०१३ मध्ये भाजपमधील आमदारांनी चारा छावणी घोटाळ्यातील दोषींवर फौजदारी करण्याची जोरदार मागणी केली होती़मी जनहित याचिका देखील दाखल केली़ न्यायालयाने आदेश दिले मात्र वारंवार शासनाकडून टोलवाटोलवी केली जात आहे.