जिल्ह्यात सेंद्रिय शेती करण्यावर भर

By Admin | Updated: July 2, 2016 03:24 IST2016-07-02T03:24:49+5:302016-07-02T03:24:49+5:30

सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करावा, यासाठी सुरुवातीला एक हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती करण्यात येणार आहे.

Focusing on organic farming in the district | जिल्ह्यात सेंद्रिय शेती करण्यावर भर

जिल्ह्यात सेंद्रिय शेती करण्यावर भर


अलिबाग : सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करावा, यासाठी सुरुवातीला एक हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यात त्यामध्ये वाढ करून संपूर्ण जिल्हा सेंद्रियमय करण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती अरविंद म्हात्रे यांनी दिली.
वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनानिमित्त रायगड जिल्हा परिषदेतर्फे ३४ शेतकऱ्यांना कृषिनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना सपत्निक शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्याहस्ते गौरविण्यात आले. त्याप्रसंगी म्हात्रे बोलत होते.
सिक्कीम राज्यामध्ये रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा नेण्यात आला होता. पहिल्या टप्प्यामध्ये एक हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय खताच्या माध्यमातून शेती करण्यात येणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे हळद लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी ६०० हेक्टरवर हळदीचे पीक घेण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असणारे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात आले असल्याचेही म्हात्रे यांनी सांगितले.
रायगड किल्ल्यावर जिल्हा परिषदेच्या जागेवर पर्यटकांची संख्या वाढत आहे. विशेषकरून ज्येष्ठ नागरिकांसाठी तेथे गार्डन उभारण्यात येणार आहे. यासाठी पंचायत समितीकडे सुमारे सहा लाख रुपये वर्ग करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पाऊस समाधानकारक सुरू झाल्याने जिल्ह्यात शेतीची कामे जोमाने सुरू झाली आहेत. यावेळी साप, विंचूदंश वाढण्याचे प्रमाण अधिक असते. त्यासाठी साप, विंचूदंशावरील लसीचा पुरेसा साठा दवाखान्यात उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेळीपालन व्यवसायातून मोठ्या संख्येने उत्पन्न प्राप्त होते. तसेच अनुदानही मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Focusing on organic farming in the district