पंढरपुरात पूर लागला ओसरू; वाढू लागली दलदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 10:57 AM2019-08-09T10:57:25+5:302019-08-09T11:00:13+5:30

रोगराई रोखण्याचे आव्हान : विस्थापितांना मोफत धान्यांचे वाटप

Floods flooded Pandharpur; The swamp began to grow | पंढरपुरात पूर लागला ओसरू; वाढू लागली दलदल

पंढरपुरात पूर लागला ओसरू; वाढू लागली दलदल

googlenewsNext
ठळक मुद्देउजनी व वीरभाटघर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीला महापूरपुराचे पाणी शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, संत पेठ, कोळी गल्ली, कुंभार गल्ली आदी भागात शिरलेकाही अर्धी गावे पुराच्या पाण्यात असल्याने तेथील शेकडो कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले

पंढरपूर : उजनी व वीर भाटघर धरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीला आलेला पूर दोन दिवसांनंतर ओसरू लागला आहे. त्यामुळे पुरात बुडालेली अनेक घरे रिकामी होत आहेत. ज्या गावांचा संपर्क तुटला होता त्या गावांचा संपर्क होत आहे. मात्र पुरामुळे अनेक घरांमध्ये चिखलसदृश परिस्थिती, उग्र वास असल्याने रोगराई रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे. पुरामुळे विस्थापित झालेल्यांना प्रशासनाकडून १० किलो गहू व १० किलो तांदळाचे वाटप करून दिलासा देण्यात येत  आहे.

उजनी व वीरभाटघर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीला महापूर आला होता. या पुराचे पाणी शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, संत पेठ, कोळी गल्ली, कुंभार गल्ली आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरले होते़ तसेच तालुक्यातील आव्हे, तरटगाव, पटवर्धन कुरोली, देवडे, खेडभाळवणी, खेडभोसे, व्होळे, गुरसाळे,  चिंचोली भोसे, भटुंबरे, कौठाळी, शिरढोण, शेळवे, पिराची कुरोली, खळवे, वाखरी, पंढरपूर, गोपाळपूर, देगाव, अजनसोंड, सुस्ते, मुंढेवाडी, चळे, सरकोली या गावांना पुराचा तडाखा बसला होता. यामधील अनेक गावांना पुराने वेढा दिल्याने गावांचा संपर्क तुटला होता.

 काही अर्धी गावे पुराच्या पाण्यात असल्याने तेथील शेकडो कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले होते. या पुरामुळे शेकडो हेक्टर ऊस शेतीचे कोट्यवधी  रुपयांचे नुकसान झाले होते. तीन दिवसांनंतर आता पूर ओसरू लागला आहे. 

गावांचा संपर्क होऊ लागला
पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली, देवडे, शेळवे, खेडभोसे, चिंचोली भोसे, शिरढोण, कौठाळी, भटुंबरे, सुस्ते, अजनसोंड आदी गावांचा संपर्क तुटला होता. गावाला जोडणाºया सर्व रस्त्यांवर पाणी असल्याने गावातील नागरिकांना बाहेर व बाहेरच्या नागरिकांना गावात जाता येत नव्हते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र आता तीन दिवसांनंतर पुराचे पाणी ओसरल्याने गावांना जोडणारे रस्तेही उघडे होत आहेत.

घरांमध्ये सर्वत्र चिखलच चिखल
- भीमा नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील व तालुक्यातील अनेक गावातील आठ हजारांपेक्षा जास्त घरे पाण्यात गेली होती. आता पूर ओसरल्यानंतर ही घरे उघडी होत आहेत. घरात पुराचे पाणी शिरल्याने त्या ठिकाणी दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे चिखलसदृश परिस्थिती, उग्र वास, जलचर प्राण्यांचे दर्शन होत असल्याने रोगराई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. ही रोगराई रोखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे खास पथके नेमून जंतुनाशक पावडरची फवारणी, लसीकरण व आपद्ग्रस्त नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहीम उघडावी, असे बोलले जात आहे़

Web Title: Floods flooded Pandharpur; The swamp began to grow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.