पाच वर्षांचीच शिक्षा का?

By Admin | Updated: May 7, 2015 11:31 IST2015-05-07T02:13:40+5:302015-05-07T11:31:51+5:30

‘हिट अ‍ॅण्ड रन ’ खटल्यात सलमान खान याला सर्व गुन्ह्यांसाठी दोषी ठरविल्यानंतर त्याला त्यासाठी किती शिक्षा द्यावी, यावर दोन्ही पक्षांचे सत्र न्यायाधीश डी. डब्लू. देशपांडे यांच्यापुढे युक्तिवाद झाले.

Five years of education? | पाच वर्षांचीच शिक्षा का?

पाच वर्षांचीच शिक्षा का?

‘हिट अ‍ॅण्ड रन ’ खटल्यात सलमान खान याला सर्व गुन्ह्यांसाठी दोषी ठरविल्यानंतर त्याला त्यासाठी किती शिक्षा द्यावी, यावर दोन्ही पक्षांचे सत्र न्यायाधीश डी. डब्लू. देशपांडे यांच्यापुढे युक्तिवाद झाले. बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या इतरांनाही जरब बसावी, यासाठी सलमान याला कायद्याने देता येणारी १० वर्षांची कमाल शिक्षा द्यावी, असा आग्रह पब्लिक प्रॉसिक्युटर प्रदीप घरत यांनी केला. याउलट सलमान खानचे वकील अ‍ॅड. श्रीकांत शिवदे यांनी सलमानचा दानशूर स्वभाव, याआधी त्याने केलेली जनसेवा, आताही पीडितांना भरपाई देण्याची त्याची असलेली तयारी व त्याचे आजारपण इत्यादींचा दाखला देत त्याला जास्तीत जास्त तीन वर्षांची शिक्षा देण्याची विनंती केली.


दानशूर सलमानला शिक्षा दिल्यास जनसेवा थांबेल
सलमान खान याला तीन वर्षे किंवा त्याहूनही कमी कारावासाची शिक्षा का द्यावी, याविषयी त्याच्यावतीने अ‍ॅड. शिवदे यांनी केलेल्या युक्तिवादाचा गोषवारा...

सलमान खान हा दानशूर आहे. सामाजिक संस्थांना तो कोट्यवधी रुपयांची मदत करीत असतो. सलमानने व्यक्तिगतरीत्याही अनेक जणांना आर्थिक मदत केली आहे. त्याचे सामाजिक कार्य सुरू असते. त्याला शिक्षा झाल्यास ही निस्वार्थ जनसेवा थांबेल.
सलमानला हृदयाचा व मेंदूचा विकार आहे. अधिक शिक्षा झाल्यास त्याचा परिणाम सलमानच्या आरोग्यावर होऊ शकतो. दिल्लीच्या बहुचर्चित संजीव नंदा खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने आरोपीला तीन वर्षांची शिक्षा ठोठावत त्याला १६ लाख रुपयांचा दंड ठोठावला. मुंबईच्या अ‍ॅलिस्टर परेरा खटल्यातही सर्वोच्च न्यायालयाने आरोपीला तीन वर्षांची शिक्षा ठोठावली. दंड ठोठावून आरोपीला पुनर्वसनाची संधी देण्याची संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने अमलात आणली आहे, याचा विचार न्यायालयाने करावा. दंडाची रक्कम पीडितांच्या नातलगांना देता येते व आरोपीचेही पुनर्वसन होते, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. नंदा प्रकरणात सहा जणांचा बळी गेला होता. तरीही सर्वोच्च न्यायालयाने आरोपीला तीन वर्षांची शिक्षा ठोठावली. याउलट सलमानने घटनेनंतर पीडितांना तत्काळ रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली.

पीडितांना १९ लाख रुपयांची मदत त्याने केली व ही रक्कम उच्च न्यायालयात जमाही केली. मुळात कोणाचा बळी घेण्याचा सलमानचा हेतू नव्हता. तो सेलीब्रिटी आहे, ही बाब विचारात घेऊनये. तो सर्वसामान्य आरोपी आहे, या दृष्टीने बघून शिक्षा द्यावी. कारण हा खटला १३ वर्षे चालला, मात्र प्रलंबित राहण्यास सलमान जबाबदार नाही.

इतरांना जरब बसण्यासाठी शिक्षा द्या !
सलमान खान हा सेलीब्रिटी आहे व त्याचे सामान्य लोक अनुकरण करतात. त्यामुळे मद्याच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवून रस्त्यावरील निरपराधांचा जीव धोक्यात घालणाऱ्या इतरांनाही जरब बसावी, यासाठी सलमान खानला जास्तीत जास्त कडक शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद पब्लिक प्रॉसिक्युटर प्रदीप घरत यांनी केला. त्यांचा युक्तिवाद थोडक्यात असा होता:
अभिनेता सलमान खान हा सेलीब्रिटी आहे. त्याचा फॅन क्लब मोठा आहे. त्याचे अनुकरण करणारे लाखो जण आहेत. सलमानने भरधाव गाडी चालवून एकाचा बळी घेतला आहे. याचे सबळ पुरावे सादर झाले असून, त्या आधारावर न्यायालयाने सलमानला दोषी धरले आहे. त्यामुळे त्याला कठोर शिक्षा झाल्यास भरधाव गाडी चालविणाऱ्या इतरांनाही जरब बसेल. सध्या भरधाव गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. भरधाव गाडी चालवायची असल्यास एक्सप्रेस वेवर जा, असे आपण सहज बोलून जातो. सलमानने गुन्हा केला आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत. त्याने कोणाला किती मदत केली, हा मुद्दा त्याच्या गुन्ह्याच्या संदर्भात गौण आहे. सलमानने केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मदतीचा विचार शिक्षा ठोठावताना करणे अयोग्य ठरेल.

भरधाव गाडी चालवणे नित्याचे झाले आहे. हे कोठे तरी थांबायला हवे. सलमानसारख्या अभिनेत्याला शिक्षा झाल्यास याचे प्रमाण कमी होईल. सलमान सामाजिक संस्थांना मदत करतो व त्याला शिक्षा झाल्यास जनसेवा थांबेल, हा बचाव पक्षाचा दावा पूर्णपणे गैरलागू आहे.
>  महत्त्वाचे म्हणजे हे सुनावणी न्यायालय आहे. सुनावणी न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर सलमानकडे उच्च व सर्वोच्च न्यायालयाचा पर्याय आहे. तेथे तो अपील करू शकतो. सत्र न्यायालयात कमी शिक्षेसाठी विनंती करणे गैर आहे. त्यामुळे कमी शिक्षेची सलमानची विनंती न्यायालयाने विचारात घेऊ नये.

हमारी पुलिस हमेशा लेट पहुँचती हैं!
सलमान खानने त्याचा शेवटचा चित्रपट ‘किक’मध्ये ‘हमारी पुलिस हमेशा लेट पहुचती हैं और गलत इन्सान को अरेस्ट करती हैं,’ असा डायलॉग मारला होता. परंतु त्याचा हा डायलॉग न्यायालयाच्या निर्णयाने खोटा ठरला.
गेल्या काही वर्षांमध्ये सलमानने चित्रपटांमधून न्यायासाठी संघर्ष करणारा जांबाज अशी आपली प्रतिमा जनमानसात तयार केली होती. परंतु प्रत्यक्ष जीवनात मात्र या विरोधाभासी रूपात बघावे लागणे हे एक विडंबनच आहे.
गर्व, वॉन्टेड, दबंगमधील पोलीसवाल्याची भूमिका असो वा जय हो आणि किकमध्ये दुसऱ्यांना सहकार्य करणारा, एकट्यानेच गुंडांचा सामना करणाऱ्या नायकाची भूमिका; सलमानने चित्रपटातील या चांगल्या प्रतिमेच्या बळावर लाखो प्रशंसक मिळविले.

न्यायाधीश देशपांडे परतवाड्याचे...
‘हिट अ‍ॅण्ड रन’ खटल्यात दोषी ठरवत सुपरस्टार सलमान खानला पाच वर्षे कैद आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावणारे मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश दिलीप देशपांडे हे अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील मूळ रहिवासी आहेत. न्यायाधीश देशपांडे यांचे बीएस़एसी़ पर्यंतचे शिक्षण परतवाड्यात झाले. देशपांडे यांचे वडील वासुदेवराव हे प्रख्यात वकील होते. त्यांनी अचलपूरच्या न्यायालयात ४० वर्षे वकिली केली. परतवाड्याच्या या सुपुत्राने प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या एका अभिनेत्याला पाच वर्षांची शिक्षा ठोठावून निर्भीडतेचा परिचय दिल्याने परतवाडावासीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.
----------
देशपांडे यांचे मनापासून अभिनंदन करते. ते परतवाड्यातील रहिवासी आहेत, ही बाब निश्चितच गौरवास्पद आहे. - माधुरी देशमुख, अध्यक्ष, सिटी हायस्कूल, अचलपूर

Web Title: Five years of education?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.