Five thousand workers from the state will go to Delhi: Balasaheb Thorat | राज्यातून पाच हजार कार्यकर्ते दिल्लीला जाणारः बाळासाहेब थोरात
राज्यातून पाच हजार कार्यकर्ते दिल्लीला जाणारः बाळासाहेब थोरात

मुंबई- केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. उद्योगधंदे बंद पडत आहेत. बेरोजगारी वाढली आहे. याविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने १४ डिसेंबर रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर विशाल भारत बचाओ महारॅलीचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातून पाच हजार काँग्रेस कार्यकर्ते या रॅलीला जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

भारत बचाओ रॅलीच्या तयारीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली गांधी भवन येथे आज रॅलीच्या नियोजनाची जबाबदारी दिलेल्या समन्वयकांची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष कानडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामकिसन ओझा, डॉ. गजानन देसाई, प्रदेश काँग्रेसचे सचिव राजाराम देशमुख आदी उपस्थित होते.

या बैठकीत भारत बचाओ रॅलीच्या तयारीचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आढावा घेतला. राज्यातून जाणा-या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वाहतूक व निवास व्यवस्थेची माहितीही त्यांनी घेतली. यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, नोकरदार मध्यमवर्गीय, महिला, विद्यार्थी असे सर्वच समाजघटक या सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे अडचणीत आले आहेत. सरकारच्या या चुकीच्या धोरणांविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या विशाल रॅलीला देशभरातून लाखो काँग्रेस कार्यकर्ते येणार आहेत. राज्यातूनही पाच हजार कार्यकर्ते दिल्ली येथे होणा-या भारत बचाओ रॅलीत सहभागी होणार आहेत.

Web Title: Five thousand workers from the state will go to Delhi: Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.