इमारत कोसळून भिवंडीत नऊ जण ठार
By Admin | Updated: August 1, 2016 04:56 IST2016-08-01T04:56:11+5:302016-08-01T04:56:58+5:30
भिवंडीच्या गैबीनगरमध्ये रविवारी दुपारी एक दुमजली इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला.

इमारत कोसळून भिवंडीत नऊ जण ठार
भिवंडी : भिवंडीच्या गैबीनगरमध्ये रविवारी दुपारी एक दुमजली इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यात चार मुले आणि तीन महिलांचा समावेश आहे. मृतांमधील चौघे एकाच कुटुंबातील आहेत. विशेष म्हणजे, ही इमारत अनधिकृत होती आणि महापालिकेने ती अतिधोकायदायक म्हणून जाहीर केली होती. मात्र मालक-भाडेकरूंच्या वादात घरे रिकामी न केल्याने रहिवाशांना प्राण गमवावे लागल्याचे समजते.
ही इमारत २६ वर्षे जुनी होती. त्यात १४ कुटुंबे राहत होती; मात्र ती मोडकळीस आल्याने त्यातील सात कुटुंबे जागा सोडून अन्यत्र गेली होती. पालिकेने ती अतिधोकादायक जाहीर केली होती. मात्र, जागा आणि भरपाईच्या वादातून सात कुटुंबांनी घरे रिकामी केली नव्हती. या वादातून नागरिकांचा नाहक बळी गेल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले. या इमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग होता.
रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे इमारत खचून ही दुर्घटना घडली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या किंकाळ्या, मदतीसाठी आक्रोश सुरू झाला. परिसरातील नागरिकांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्याला सुरुवात केली. ढिगाऱ्याखालून संध्याकाळपर्यंत २० जणांना बाहेर काढण्यात आले असून या सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. तर, ढिगाऱ्याखाली अजून पाच जण अडकल्याची माहिती बचावलेल्यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
>मृतांची नावे : आएशा मोमीन अन्सारी (५०), सय्यद खुर्शीद आलम अन्सारी (१७), खालीद खुर्शीद आलम अन्सारी (१६), शाकीम खुर्शीद आलम अन्सारी (१२), शहाजहाँ खुर्शीद आलम अन्सारी (४२), मुदस्सीर खुर्शीद आलम अन्सारी (२०), रोहेफ एजाज शाह (१०), सुफिया शाहनवाज शेख (१९) आणि अन्य एकाची ओळख पटलेली नाही.
चिमुकले बचावले...
इमारत कोसळल्यानंतर परिसरातील तरुणांनी इमारतीकडे धाव घेतली आणि बचावकार्याला सुरुवात केली. तेव्हा त्यांना लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. त्यांनी त्या दिशेचा अंदाज घेत ढिगारा दूर केला असता आठ महिन्यांचा अब्दुल रेहमान शानवाज मोमीन हा आढळला. त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले. त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्याच परिस्थितीत नंतर जैद अन्सारी (सात महिने) हा देखील सापडला. त्यालाही फ्रॅक्चर आहे. या दोघांनाही उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले आहे.