पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले
By Admin | Updated: August 12, 2014 03:01 IST2014-08-12T02:43:06+5:302014-08-12T03:01:43+5:30
गेल्या वर्षी झालेल्या गारपिटीने डोळ्यांत पाणी आणल्यानंतर या वर्षी तरी वरुणराजाची दमदार हजेरी होईल, या आशेवर मराठवाड्यात शेतकऱ्यांनी कर्जे काढून पेरण्या केल्या़

पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले
परभणी/बीड/ नांदेड : गेल्या वर्षी झालेल्या गारपिटीने डोळ्यांत पाणी आणल्यानंतर या वर्षी तरी वरुणराजाची दमदार हजेरी होईल, या आशेवर मराठवाड्यात शेतकऱ्यांनी कर्जे काढून पेरण्या केल्या़ मात्र, पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग अधिक गडद झाले आहेत़ मराठवाड्यात पावसाअभावी येणारी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे़ गेल्या २४ तासांत परभणी, बीड जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर नांदेड जिल्ह्यात एक अशा पाच शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली़
परभणी तालुक्यातील मिरखेल येथे भोजराज भिवाजी कनकुटे (५५) यांनी सोमवारी सकाळी १० वाजता शेतातील झाडाला गळफास घेतला. नापिकी व कर्ज कसे फेडावे या नैराश्येतूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांचा मुलगा नारायण कनकुटे यांनी पोलिसांना सांगितले. दुसऱ्या घटनेत पूर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारात कैलास पांडुरंग कुऱ्हे पळसकर (३३) असे याने रविवारी रात्री गळफास घेतला.
दुबार, तिबार केलेली पेरणी वाया गेल्याने कर्ज कसे फेडावे? या विवंचनेत सापडलेल्या नांदेड जिल्ह्यातील बरबडा येथील रामदास आलमकर (५५) यांनी सोमवारी विषारी द्रवप्राशन करून आत्महत्या केली. बीड जिल्ह्याच्या शिरूरकासार तालुक्यातील फुलसांगवी येथील लहू सर्जेराव गोरडे (५५) या शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली़ त्यांच्यावर सोसायटीचे कर्ज होते. तर दुसऱ्या घटनेत धारूर तालुक्याच्या बोडका येथे रामभाऊ साळुंके (५४) यांनी सोमवारी सकाळी शेतात झाडाला गळफास घेतला. त्यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला मात्र रात्री उशिरापर्यंत नोंद नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)