स्मार्ट रस्त्यांमध्ये राज्यातील पाच शहरांची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 08:45 AM2021-08-25T08:45:07+5:302021-08-25T08:45:12+5:30

केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सहभागी झालेल्या शहरांना विविध उपक्रम आयोजित करण्यास सांगितले. ‘स्ट्रीट्स फॉर पिपल’ हा उपक्रमदेखील त्याचाच एक भाग आहे.

Five cities in the state bet on smart roads | स्मार्ट रस्त्यांमध्ये राज्यातील पाच शहरांची बाजी

स्मार्ट रस्त्यांमध्ये राज्यातील पाच शहरांची बाजी

googlenewsNext

मुजीब देवणीकर
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केंद्र शासनाने स्मार्ट शहरांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी आयोजित केलेल्या ‘स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंज’ या स्पर्धेत राज्यातील पाच शहरांनी बाजी मारली आहे. औरंगाबादसह नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड आणि पुणे या शहरांचा यात समावेश आहे. देशभरातील ११३ शहरांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. पहिल्या ३० प्रमुख शहरांची घोषणा मंगळवारी केंद्र शासनाने केली.

महापालिकेचे प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या नेतृत्त्वाखाली औरंगाबाद शहराने या उपक्रमात सहभाग घेतला. क्रांती चौकातील झाशी राणी पुतळ्यासमोरील रस्त्यावर या उपक्रमाचे आयोजन केले.
यात स्टेज एकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पहिल्या ३० शहरांची यादी जाहीर केली. यात औरंगाबादचा समावेश आहे. पहिल्या ३० शहरांच्या यादीत औरंगाबादसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक व नागपूरचा समावेश आहे. इतर राज्यांतील अमृतसर, बंगळुरू, भोपाळ, चंदीगड, गंगटोक, गुरुग्राम, हुबळी धारवाड, इंफाळ, इंदूर, जबलपूर, झाशी, यासह इतर शहरांचा समावेश आहे.

केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सहभागी झालेल्या शहरांना विविध उपक्रम आयोजित करण्यास सांगितले. ‘स्ट्रीट्स फॉर पिपल’ हा उपक्रमदेखील त्याचाच एक भाग आहे. यात शहरातील प्रमुख रस्त्यांवर सर्वसामान्यांना पायी फिरता यावे, बाजारपेठेत कोणत्याही वाहनाविना मुक्तपणे खरेदी करता यावे, तो परिसर प्रदूषणमुक्त ठेवणे, वयोवृद्ध नागरिकांसाठी 
ई-वाहनांची सोय, रस्त्याच्या कडेला आरामशीर बसता यावे, अशा सुविधा निर्माण करणे अपेक्षित आहे.

चार रस्ते
क्रांती चौक ते गोपाल कल्चरल हॉल, गुलमंडी ते पैठणगेट, कॅनॉट प्लेस, एमजीएम प्रियदर्शनी उद्यान रोड स्ट्रीट्स फॉर पिपल उपक्रमासाठी निवडण्यात आले आहेत. क्रांती चौक येथे तसा रस्ताही तयार केला आहे. कॅनॉट प्लेसमध्ये काम सुरू करण्यात आले.

Web Title: Five cities in the state bet on smart roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.