नागपूरजवळ एसी बस पेटून ५ जण जळून खाक
By Admin | Updated: May 30, 2014 01:45 IST2014-05-30T01:45:39+5:302014-05-30T01:45:39+5:30
धावत्या खासगी बसने अचानक पेट घेतल्याने ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीषण घटना गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास सत्याग्रही घाटाच्या पायथ्याशी घडली़

नागपूरजवळ एसी बस पेटून ५ जण जळून खाक
अनिल रिठे, तळेगाव (जि. वर्धा) - धावत्या खासगी बसने अचानक पेट घेतल्याने ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीषण घटना गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास सत्याग्रही घाटाच्या पायथ्याशी घडली़ यात १५ प्रवासी गंभीररीत्या भाजले असून जखमींपैैकी पाच जणांना नागपूरला हलवण्यात आले आहे. बसच्या वातानुकूलित यंत्रणेत शॉर्टसर्किट झाल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतांपैकी दोघांची ओळख पटली असून तिघांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेनंतर बसचालक राजेश व क्लीनर पळून गेले. बाबा ट्रॅव्हल्सची बस सुमारे ४० प्रवासी घेऊन जळगावहून नागपूरकडे जात होती. पहाटे ४.४५ च्या सुमारास सत्याग्रही घाटाच्या पायथ्याशी असलेल्या जैन मंदिराजवळ या बसने अचानक पेट घेतला. क्षणार्धात आगीने संपूर्ण बसला विळखा घातला. चालकाने बस थांबवल्यावर काही प्रवाशांनी खिडकी व दारातून उड्या टाकल्या़ यातील साखरझोपेत असलेल्या पाच प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला़ मृतांपैकी दोघांची ओळख पटली आहे़ यात सुनील सच्चिदानंद पाल (रा. मटकापूर, बिहार) यांचा नऊ महिन्यांचा मुलगा आदित्य व पत्नी श्वेता (२८) यांचा समावेश आहे.