Sanjay Raut Anil Gote Dhule news: धुळ्याच्या राजकारणात बुधवारी मोठी खळबळ उडाली. विधिमंडळ अंदाज समितीचे ११ आमदार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृहावर धडक दिली. गुलमोहर विश्रामगृहाच्या खोली क्रमांक १०२ ला त्यांनी कुलूप ठोकले. या खोलीमध्ये आमदारांना देण्यासाठी आणलेले साडेपाच कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत, असा दावा अनिल गोटे यांनी केला. खासदार संजय राऊतांनीही ट्विट करत खळबळ उडवून दिली. या खोलीबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी ठाण मांडून बसले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अंदाज समितीत असलेल्या ११ आमदारांना देण्यासाठी ही रक्कम आणली आहे, असा दावा माजी आमदार अनिल गोटे यांनी १०२ नंबरच्या खोलीला कुलूप लावल्यानंतर केला. कुलूप लावल्यानंतर अनिल गोटे आणि पदाधिकारी तिथेच ठाण मांडून बसले आहेत.
अनिल गोटेंची मागणी काय?
जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत या खोलीचा दरवाजा उघडला जावा, अशी मागणी अनिल गोटेंची आहे.
असा महाराष्ट्र लुटण्यासाठी उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले का?
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाबद्दल ट्विट करत सरकारी यंत्रणांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला.
संजय राऊत म्हणाले, "आत्ताची ताजी खबर. विधिमंडळ आमदारांची अंदाज समिती आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आली असता, या समितीला मलिदा देण्याकरता जवळपास साडेपाच कोटी रुपये धुळे शासकीय विश्रामगृह गुलमोहर येथे रूम नंबर 102 मध्ये जमा करण्यात आले होते. त्या ठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सदरच्या रूमला कुलूप लावून पहारा ठेवला आहे."
वाचा >>'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
"या संदर्भात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो या सर्वांना सूचना दिल्यानंतर देखील चार ते पाच तास उलटून गेल्यावर देखील कोणीही अद्याप आलेला नाही. प्रशासनाकडून कुठलेही सहकार्य मिळत नाही आहे; विकासकामांमध्ये होणारा भ्रष्टाचार, त्यामध्ये असणारा अधिकाऱ्यांचा सहभाग हे सर्व दाबण्याकरता या आमदारांना हा मलिदा देण्यात येत होता. शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर या समितीचे अध्यक्ष आहेत! उद्धव ठाकरे यांचे सरकार का पाडले? हा असा महाराष्ट्र लुटण्या साठीच!", असा संतप्त सवाल संजय राऊतांनी महायुतीला केला आहे.
अंदाज समितीच्या आमदारांना देण्यासाठी जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी पैसे गोळा केले आहेत. आणि ते पैसे विश्रामगृहावर आणलेले आहेत, असा दावा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.