साक्ष देताना वडीलच झाले फितूर
By Admin | Updated: August 18, 2014 00:39 IST2014-08-18T00:39:12+5:302014-08-18T00:39:12+5:30
दीड वर्षांच्या चिमुकल्याच्या निर्घृण खुनात साक्ष देताना वडीलच फितूर झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी संशयाचा लाभ देऊन आरोपी मातेची निर्दोष सुटका केली

साक्ष देताना वडीलच झाले फितूर
न्यायालय : पोटच्या गोळ्याच्या खुनात माता निर्दोष
नागपूर : दीड वर्षांच्या चिमुकल्याच्या निर्घृण खुनात साक्ष देताना वडीलच फितूर झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी संशयाचा लाभ देऊन आरोपी मातेची निर्दोष सुटका केली.
राजकुमारी लल्लू उईके, असे आरोपी महिलेचे नाव आहे. ऋषिकेश, असे दुर्दैवी मृत चिमुकल्याचे नाव होते. ही घटना १ जानेवारी २०१४ रोजी खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर तालुक्याच्या भेंडाळा गावात घडली होती. सरकार पक्षानुसार या घटनेची हकीकत अशी की, लल्लू उईके हा कुटुंबासह भेंडाळा गावात राहून सरपंच चंद्रशेखर चौधरी यांच्या शेतात मजुरीचे काम करायचा. घटनेच्या दिवशी दारूच्या नशेत त्याने पत्नी राजकुमारी हिला मारहाण करून घरातून निघून जाण्यास म्हटले होते. त्यामुळे रात्री १० वाजताच्या सुमारास ती रागाने आपला दीड वर्षांचा मुलगा ऋषिकेश याला सोबत घेऊन घरातून निघून गेली होती. रस्त्याने जाताना ऋषिकेश जोरजोराने रडत होता. रडण्याने गाव जागे होईल म्हणून तिने एका शेताच्या आडोशाला साडीचा पदर फाडून कापडाचा बोळा चिमुकल्याच्या तोंडात कोंबला आणि दगडावर आपटून खून केला होता. मुलाचा मृतदेह पऱ्हाटीच्या शेतात दडवून ती रेल्वेने नागपुरात आली होती. तिने नागपूर रेल्वेस्थानकावरील जीआरपी पोलीस ठाणे गाठून मुलगा हरवल्याची बनावट तक्रार नोंदवली होती.
७ जानेवारी २०१४ रोजी संजय चौधरी हे आपल्या शेतात गेले असता त्यांना एका चिमुकल्याचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता. त्यांनी सरपंचाला ही माहिती दिल्यानंतर सरपंच यांनी खापा पोलिसांना कळविले होते. हेड कॉन्स्टेबल पी. एच. कटरे यांनी स्वत: फिर्यादी होऊन अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंविच्या ३०२, २०१ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. मृतदेहाची ओळख पटून राजकुमारी हिला अटक करण्यात आली होती. हे संपूर्ण प्रकरण परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होते. न्यायालयात नऊ साक्षीदार तपासण्यात आले होते. मृत मुलाचा जन्मदाता लल्लू उईके, सरपंच आणि अन्य साक्षीदार न्यायालयात साक्ष देताना फितूर झाले. पोलिसांनीच बरोबर साक्ष दिली. त्यामुळे सबळ पुराव्याअभावी संशयाचा लाभ मिळून आरोपी मातेची निर्दोष सुटका झाली. न्यायालयात आरोपीच्यावतीने अॅड. गिरीधर पायघन, भूषण झलके तर सरकारच्यावतीने सरकारी वकील प्रशांत भांडेकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)