खाजगी सोसायटीतील पहिले लसीकरण केंद्र सुरु; मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 17:54 IST2021-06-13T17:53:43+5:302021-06-13T17:54:34+5:30
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील सोसायटय़ांत खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून सशुल्क लसीकरण करण्याचे धोरण महापालिका प्रशासनाने नुकतेच जाहीर केले होते.

खाजगी सोसायटीतील पहिले लसीकरण केंद्र सुरु; मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
कल्याण: कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीतील सोसायटय़ांत खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून सशुल्क लसीकरण करण्याचे धोरण महापालिका प्रशासनाने नुकतेच जाहीर केले होते. त्यानुसार कासाबेला या बड्या गृहसंकुलातील कासाबेला फेडरेशनच्यावतीने लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्राचा शुभारंभ मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कासाबेला फेडरेशनचे अशुतोष कुमार उपस्थित होते. महापालिका हद्दीतील सोसायटीमध्ये सुरु झालेले कासाबेला हे पहिले केंद्र ठरले आहे.
कासाबेला या गृहसंकूलात ३ हजार रहिवासी आहे. आज पहिल्या दिवशी ६०० जणांनी नोंदणी केली आहे. त्या सगळ्यांना लसीकरण करण्यास सुरवात झाली आहे. आमची सोसायटी प्रथम महापालिकेकडे अप्रोच झाली होती. त्यानंतर महापालिकेने सांगितल्यानंतर सोसायटीने रिलायन्स रुग्णालयाशी टायअप करुन हे लसीकरण केंद्र सुरु केले आहे. त्याचा ३ हजार नागरीकांना लाभ होणार आहे.
लसीकरण केंद्राच्या शुभारंभ करणारे मनसे आमदार पाटील यांनी सांगितले की, महापालिककडे मी लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती. लसीकरण केंद्राचा सगळा सेटअप आणि जागा उपलब्ध करुन देणार आहे. महापालिकेने केवळ लस उपलब्ध करुन द्यायची आहे. मात्र या मागणीची पूर्तता अद्याप महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. कासाबेला या सोसायटीतील नागरीकांनी लसीचा पहिला डोस घेतल आहे. ते विकत घेऊ शकतात. मात्र या नागरीकाना लसीचा दुसरा डोस मोफत दिला जावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे. केडीएमसी हद्दीतील लसीकरण जास्तीत जास्त व्हावे यासाठी लसीकरण केंद्राची मागणी केली होती. ती पूर्ण झालेली नाही. मात्र अन्य राज्यात घरोघरी जाऊन लसीकरण केले जात आहे. त्यामुळे महापालिकेने ही घरोघरी जाऊन लसीकरण करावे अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.