इतिहासात पहिल्यांदाच मुहूर्त चुकणार, गुढीपाडव्याला सराफा दुकाने बंद
By Admin | Updated: April 7, 2016 21:57 IST2016-04-07T21:57:16+5:302016-04-07T21:57:16+5:30
३७ दिवसांपासून सुरू असलेला सराफा व्यापाऱ्यांचा संप गुढी पाडव्यालाही सुरूच राहणार असल्यामुळे साडे तीन महुर्तापैकी अशा मुहुर्तावर ग्राहकांना सोने खरेदीपासून वंचित राहावे लागणार आहे.

इतिहासात पहिल्यांदाच मुहूर्त चुकणार, गुढीपाडव्याला सराफा दुकाने बंद
संपामुळे हुकणार गुढी पाडव्याची सोनेखरेदी
मुंबई - केंद्रीय अर्थसंकल्पात दागिन्यांवर एक टक्का अबकारी कर लावल्यामुळे गेल्या ३७ दिवसांपासून सुरू असलेला सराफा व्यापाऱ्यांचा संप गुढी पाडव्यालाही सुरूच राहणार असल्यामुळे साडे तीन महुर्तापैकी अशा मुहुर्तावर ग्राहकांना सोने खरेदीपासून वंचित राहावे लागणार आहे. संपामुळे व्यापाऱ्यांचे तर नुकसान होत आहेच; पण सरकारचा महसूल बुडतानाच ग्राहकांचाही हिरमोड होत आहे. मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सराफा बाजारात रोज सुमारे २५० कोटी रुपयांची उलाढाल होते.
मात्र साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या मुहूर्तावर एकट्या मुंबईतून यंदा ५०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता होती. गेल्यावर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याचा भाव प्रति तोळा २५ हजार ९५६ रुपये होेता. तो अक्षय्य तृतीय्येला २४ हजारांपर्यंत जाण्याच्या अपेक्षेमुळे पाडव्याला सोने खरेदीत निरुत्साह दिसला होता. मात्र तरीही मुंबईतील सराफा बाजाराने ३५० कोटींची आकडा पार केला होता. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात होणारी वाढ पाहता अक्षय्य तृतीय्येला सोन्याचा दर प्रति तोळा ३० हजारांहून अधिक होण्याची शक्यता होती. त्यामुळे गुढीपाडव्याला अधिकाधिक खरेदी होण्याची शक्यता होती.
सरकारने लादलेला अबकारी कर गुरूवारी रात्रीपर्यंत मागे घेण्याची शक्यता धूसर असल्याने शुक्रवारी गुढीपाडव्याच्या दिवशी संप कायम ठेवण्याचा निश्चय संघटनेने केला आहे. खरेदी विक्री व्यवहार बंद असला, तरी गुढीपाडव्यानिमित्त होणारी पूजा दुकानातच करणार असल्याचे जैन यांनी सांगितले. अनेक दुकानदारांना दिवाळीला चोपडा पूजन करता येत नाही. असे दुकानदार गुढीपाडव्याला चोपडा पूजन करतात. त्यामुळे दुकाने बाहेरून बंद असली, तरी पूजेसाठी आतून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई, दिल्ली, कोलकत्यासह प्रमुख शहरांतील सराफा प्रतिष्ठाने बंद असली तरीही तामिळनाडूतील सराफांनी त्यांचा संप मागे घेतल्याने तेथील प्रतिष्ठाने खुली आहेत. सराफांच्या मागणीचा विचार करण्यासाठी सरकारने एक समिती गठित केली असून, समितीला ६० दिवसांच्या आत अहवाल देण्यास सांगितले आहे.
सुट्टीतही दुकाने सुरू ठेवली होती...
मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार अनेक ठिकाणी सोमवारी आणि रविवारी सराफांची दुकाने बंद असतात. मात्र याआधी इतिहासात रविवारी आणि सोमवारी गुढीपाडव्यानिमित्त दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. मुहूर्ताचा दिवस असल्याने त्यादिवशी खरेदी विक्रीचे व्यवहारही झाले होते. मात्र यंदा प्रथमच सुट्टीचा दिवस नसतानाही केवळ संपामुळे दुकाने बंद ठेवण्याची वेळ दुकानदारांवर आली आहे.
मुहुर्ताला होतो एक टन सोन्याचा व्यवहार लग्नसराई आणि सणासुदीच्या तुलनेत प्रत्यक्ष मुहुर्ताच्या दिवशी सराफांच्या दुकानातील व्यवहारात किमान ३० ते ३५ टक्के वाढ होते. गेल्यावर्षी पाडव्याला राज्यभरात तब्बल एक टन सोन्याची विक्री झाली होती. यंदा संप असल्यामुळे व्यवहारच होणार नाहीत.