Mucormycosis: डोंबिवलीत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी?; रुग्णालयाचा बोलण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 16:42 IST2021-05-11T15:55:45+5:302021-05-11T16:42:53+5:30
Mucormycosis: म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाल्याची मुलानं दिली माहिती; सध्या रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या सहा रुग्णांवर उपचार सुरू

Mucormycosis: डोंबिवलीत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी?; रुग्णालयाचा बोलण्यास नकार
कल्याण: कल्याण डोंबिवलीत म्युकरमायकोसीस पहिला बळी गेला आहे. डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात सहा रुग्णावर उपचार सुरू असताना बाजीराव काटकर (वय ६९ वर्षे) यांचा या आजारामुळे मृत्यू झाल्याची माहिती त्यांचा मुलगा वैभव काटकर यांनी दिली आहे. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने काही बोलण्यास नकार दिला आहे.
दावडी परिसरात सेवा निवृत्त बाजीराव काटकर हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. २५ एप्रिल रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आधी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणी २ लिटर ऑक्सिजनची गरज होती. त्याना म्युकरमायकोसीस आजार झाल्याने त्यांना चांगल्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला काही डॉक्टरांनी दिला होता. बाजीराव काटकर यांचा मुलगा वैभव याचे म्हणणे आहे की, डॉक्टरांच्या सल्ल्याने वडिलांना एम्स रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी १५ लिटर ऑक्सिजनची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. म्युकरमायकोसीस आजाराने त्यांचा एक डोळा बाधित झाला होता. याच आजाराने त्यांचा दुदैवी मृत्यू झाला. वडिलांना चांगले उपचार मिळाले नाहीत असे वैभव यांनी सांगितले. या खाजगी रुग्णालयात सहा रुग्ण म्युकरमायकोसीसचे आहेत. याबाबत रुग्णालय प्रशासनाने काही बोलण्यास नकार दिला आहे.
धोका वाढला! म्युकरमायकोसिस मुंबईच्या वेशीवर पोहोचला; ठाण्यात पहिल्या रुग्णाची नोंद
दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर सरवणकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे सात रुग्ण आढळून आले आहेत. एका रुग्णाचा मृत्यू झाला असला तरी त्याच्या मृत्यूचे नेमके कारण रुग्णालय प्रशासनाकडून नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू म्युकरमायकोसीसमुळेच झाला असल्यास दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.