एसटीचे पहिले कंडक्टर झाले ९७ वर्षांचे; नगरमधून धावली होती ७३ वर्षांपूर्वी राज्यातील पहिली एसटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 07:06 AM2021-06-01T07:06:01+5:302021-06-01T07:07:13+5:30

पहिली बस नगरहून पुण्यापर्यंत धावली आणि या पहिल्या बसचे वाहक लक्ष्मण केवटे हेही नगरचेच. आज ते ९७ वर्षांचे असून, एसटीच्या स्थापनादिनानिमित्त त्यांनी माझ्यासारखीच एसटीही दीर्घायुषी होवो, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

The first conductor of ST became 97 years old | एसटीचे पहिले कंडक्टर झाले ९७ वर्षांचे; नगरमधून धावली होती ७३ वर्षांपूर्वी राज्यातील पहिली एसटी

एसटीचे पहिले कंडक्टर झाले ९७ वर्षांचे; नगरमधून धावली होती ७३ वर्षांपूर्वी राज्यातील पहिली एसटी

Next

- चंद्रकांत शेळके 

अहमदनगर : महाराष्ट्राच्या रस्त्यावर पहिली एसटी बस धावली तो दिवस होता १ जून १९४८. आज एसटीला ७३ वर्षे पूर्ण झाली. पहिली बस नगरहून पुण्यापर्यंत धावली आणि या पहिल्या बसचे वाहक लक्ष्मण केवटे हेही नगरचेच. आज ते ९७ वर्षांचे असून, एसटीच्या स्थापनादिनानिमित्त त्यांनी माझ्यासारखीच एसटीही दीर्घायुषी होवो, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.  किसन राऊत नावाच्या व्यक्तीला ही पहिली एसटी बस चालवण्याचा बहुमान मिळाला होता. ते आज हयात नाहीत. तेही नगरचेच. 

या पहिल्या एसटीच्या प्रवासाबाबत सांगताना केवटे म्हणतात, माळीवाड्यातील लक्ष्मीमाता मंदिराजवळून एसटी बस सुटायच्या. तेव्हा नगरहून पुण्याचे तिकीट होतं अडीच रुपये. वाहकाचा पगार ८० रुपये असायचा, तर आठ आणे भत्ता मिळायचा. आम्ही दोघांनी १ जून १९४८ रोजी सकाळी आठ वाजता माळीवाडा स्टँडवर गाडी आणली. त्यावेळी बसची आसन क्षमता ३० प्रवाशांची होती. वाहतूक अधिकारी दादासाहेब मिरीकर यांनी गाडीची पूजा करून नारळ फोडला आणि गाडी सोडण्यात आली. त्या दिवशी २३ प्रवासी पुण्यासाठी नगरहून बसले. तर पुढे चास, कामरगाव, सुपा येथून ७ प्रवासी घेतले व गाडी फुल्ल झाली. बारा वर्षे वाहक, बारा वर्षे कंट्रोलर, १२ वर्षे निरीक्षक अशी ३६ वर्षे सेवा करून १९८४ साली मी एसटीतून निवृत्त झालो. विशेष म्हणजे आज ७३ वर्षांनंतर त्यावेळचा एकही कर्मचारी हयात नाही. 

एकमेव साक्षीदार
केवटे हे पहिल्या एसटीचे एकमेव साक्षीदार आहेत. त्यांना सध्या एसटीकडून निवृत्तीवेतन मिळत नाही. एसटी प्रवासाचा पास तेवढा आहे. 

Web Title: The first conductor of ST became 97 years old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.