भोसरीत तरूणावर गोळीबार; 24 तासातील दुसरी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 13:05 IST2017-09-16T10:03:50+5:302017-09-16T13:05:26+5:30
भोसरीत विजय पांडुरंग घोलप या तरुणावर शनिवारी पहाटे गोळीबार झाला आहे.

भोसरीत तरूणावर गोळीबार; 24 तासातील दुसरी घटना
पिंपरी, दि. 16 - राजकीय वैमनस्यातून पिंपरीत संतोष कुरवात या गुंडावर शुक्रवारी गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना, भोसरीत विजय पांडुरंग घोलप (वय 34) या तरुणावर शनिवारी पहाटे गोळीबार झाला आहे. या गोळीबारात विजय घोलप जखमी झाले आहेत. व्याजाने पैसे घेण्याच्या व्यवहारातून ही घटना घडली असल्याची चर्चा आहे. या गोळीबाराची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
गावलीमाथा भोसरी येथे संतोष घोलप याचं कॅन्टीन आहे. सकाळी संतोष घोलप त्यांच्या कॅन्टीनमध्ये आल्यावर ही घटना घडली. घोलप कॅन्टीनवर येताच दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. घोलप यांच्यावर दोन राऊंड फायरिंग झाली. यामध्ये घोलप जखमी झाले. गोळीबारात संतोष यांच्या हाताला गोळी लागली. तातडीने त्यांना चिंचवड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या चोवीस तासात गोळीबाराची घडलेली ही दुसरी घटना आहे.
शुक्रवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी पिंपरीच्या साधू वासवाणी चौकात हॉटेलमध्ये बसलेल्या संतोष कुरावत यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. ही घटना ताजी असताना भोसरी येथील गवळीमाथा येथे घोलप यांच्यावर गोळीबार झाला आहे.