अंधेरीत मेडीकल दुकानाला आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
By Admin | Updated: June 30, 2016 08:48 IST2016-06-30T08:48:32+5:302016-06-30T08:48:32+5:30
मुंबईत अंधेरी पश्चिमेला मेडीकल दुकानाला लागलेल्या भीषण आगीमध्ये आठ जण होरपळून ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अंधेरीत मेडीकल दुकानाला आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - मुंबईत अंधेरी पश्चिमेला एका मेडीकल दुकानाला लागलेल्या भीषण आगीमध्ये नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये एक पुरुष, दोन महिला आणि पाच लहान मुलांचा समावेश आहे. यात एक तीन महिन्यांचा मुलगी आहे. कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या महिलेचाही मृत्यू झाला आहे. या महिलेला आधी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
वायरलेस रोडवरील जुहू गल्लीतील निगम मिस्त्री चाळीत वाफा मेडीकल स्टोअर हे दुकान आहे. तीन मजली इमारतीत तळ मजल्यावर दुकान आणि वरच्या दोन मजल्यावर रहिवासी रहात होते. गुरुवारी सकाळी ६.२० च्या सुमारास मेडीकल दुकानात आग भडकल्यानंतर वरच्या मजल्यापर्यंत ही आग पसरली.
वरच्या दोन मजल्यावरील खोल्यांमध्ये १७ ते १८ जण रहात होते. अत्यंत दाटी-वाटीची जागा असल्यामुळे आग लागल्यानंतर सर्वांना लगेच खाली उतरता आले नाही. त्यात इमारतीच्या पाय-याही छोटया होत्या. त्यामुळे काही जणांचा भाजून तर, काहींचा गुदमरुन मृत्यू झाला. या आगीत एकाच कुटुंबातील चार ते पाच जण ठार झाल्याची शक्यता आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाडया तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. तीन फायर इंजिन आणि दोन वॉटर टँकर घटनास्थळी पाठवण्यात आले. तासाभरात सकाळी साडेसात वाजता ही आग विझवण्यात आली.
शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे असे मुंबई पोलिसांचे जनसंर्पक अधिकारी अशोक दुधे यांनी एएनआयशी बोलताना सांगितले. आग विझवताना अग्निशमन दलाचे कर्मचारी अविनाश सिंगणकर किरकोळ जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला.
दुर्घटनेतील मृतांची नावे
साबुरीया मोझीन खान (५२) सिद्दीक खान (३५) राबिल खान (२८) मोझहेल खान (८) उन्नीहय खान (५) अलीझा खान (४) तुब्बा खान (८) अल्ताझ खान (३ महिने)
साबिया खान ही २८ वर्षीय महिला ४५ टक्के भाजली असून तिला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
}}}}Andheri West medical store fire UPDATE: Eight people killed pic.twitter.com/Qx3KH8tKt5
— ANI (@ANI_news) June 30, 2016