मुंबई-पुणे जुन्या एक्स्प्रेस वे वर पेट्रोल टँकरला आग; वाहतुकीचा खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 15:25 IST2017-08-06T11:51:00+5:302017-08-06T15:25:20+5:30
पुणे, दि. 6 - मुंबई-पुणे जुन्या एक्स्प्रेस वेवर एका पेट्रोलच्या टँकरला अपघात झाल्यानंतर तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. त्यामुळे काही ...

मुंबई-पुणे जुन्या एक्स्प्रेस वे वर पेट्रोल टँकरला आग; वाहतुकीचा खोळंबा
पुणे, दि. 6 - मुंबई-पुणे जुन्या एक्स्प्रेस वेवर एका पेट्रोलच्या टँकरला अपघात झाल्यानंतर तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. त्यामुळे काही वेळासाठी या मार्गावरची वाहतूक बंद केली होती. मात्र हळूहळू वाहतूक पूर्वपदावर येत असून, वाहन चालकांना प्रचंड कोंडी सहन करावी लागतेय. रसायनी जवळच्या भोकरपाडा येथे सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास हा पेट्रोलच्या टँकला अपघात झाला. त्यामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला.
वाहतुकीच्या खोळंब्यामुळे या मार्गावरची वाहतूक सावलामार्गे वळवली. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भरधाव अनेकदा अपघात घडतात. गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगातील इनोव्हा कार क्र. (टऌ 23 अङ 3888) च्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली उतरुन तब्बल 3झाडांना धडकून नाल्यामध्ये कोसळली होती. या अपघातात 1 जण जागीच ठार तर 3 जण जखमी झाले होते.
अपघातात सांदीपान भगवान शिंदे वय 60 वर्षे रा.बीड) यांचा मृत्यू झाला होता, सुभाष साहेबराव जगताप (वय ७० वर्षे), किसन जठार (वय 71 वर्ष), मुक्ताराम किसन तावरे (वय 71 वर्षे सर्व राहणार धानेगल्ली, बीड) हे जखमी झाले होते. जखमीना निगडी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळ्याजवळील वलवण व कुणेगाव पूलांसह दस्तुरी गावच्या हद्दीत अनेक ठिकाणी पावसामुळे मोठमोठे खड्डे पडून मार्गाची चाळण झाल्याने जलद व सुरक्षित प्रवासासाठी संबोधला जाणारा मार्ग सध्या असुरक्षित बनला असून, अपघातांना निमंत्रण देणारा ठरला आहे. यामुळे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी खड्ड्यांमुळे धोकादायक झालेल्या परिसरात आपल्या वाहनांच्या वेगावर अंकुश ठेवून, सुरक्षित प्रवास करावा.