Santosh Deshmukh Case ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो समोर आले आहेत. फोटो समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता हे फोटो पाहून मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, संतोष अण्णाला कपडे काढून मारलं, त्यांचे फोटो पाहून काळीज हेलावून जातंय. एवढी क्रूरता करण्याचं धाडसं कसं झालं? आता तरी अजित पवार आणि फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना लाथ मारुन बाहेर काढावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. धनंजय मुंडे यांनी स्वतःहून आमदारकीसह सगळ्याच पदांचा राजीनामा द्यावा, स्वतःहून जेलमध्ये जावं अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, "धनंजय मुंडे यांच्यावर जर भगवानबाबांचे संस्कार असतील, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार असतील तर मनाने आमदारकीसह सर्व पदांचा राजीनामा द्यावा आणि यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीपाशी जाऊन राजीनामा दे. तू स्वतःहून जेलमध्ये जा. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी मुंडेंना लाथ मारून बाहेर काढावं. असं जर केलं नाही तर थू तुमच्या जिंदगीवर, असंही जरांगे पाटील म्हणाले.
मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राज्यभर खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन दिवसापूर्वी आरोप पत्र दाखल केले आहे. वाल्मीक कराड या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. यामुळे आता धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा अशी राज्यात मागणी सुरू आहे.दरम्यान, काल रात्री उशीरा देवगीरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोन तास बैठक झाली आहे, या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे, खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल पटेल हे देखील उपस्थित होते. या बैठकीचा तपशील बाहेर आलेला नाही. पण, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात ही चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे.