मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 06:49 IST2025-11-04T06:47:48+5:302025-11-04T06:49:15+5:30
प्रत्येक बूथवर विशेष मोहीम; घरी जाऊन विचारणार ‘कुठे मतदान करणार’

मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मतदार याद्यांमधील दुबार नावे हटवून मगच निवडणुका घ्या, अशी मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली असताना आता राज्य निवडणूक आयोगाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना ही दुबार शोधा व दुबार मतदान होणार नाही याची खात्री करा, असे आदेश दिले आहेत. त्यासाठी प्रत्येक बूथवर विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
दुबार मतदारांची नावे एका ठिकाणाहून हटविण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाहीत. मात्र, दुबार मतदान कोणीही करू नये यासाठी आता वेळेवर काय करता येईल, याचा अभ्यास करून राज्य निवडणूक आयोगाने आदेशात असे म्हटले आहे की, ज्या-ज्या मतदारांची दुबार नावे आहेत त्यांची नावे शोधून काढा आणि ते एकाच ठिकाणी मतदान करतील, दोन ठिकाणी मतदान करणार नाहीत याची खातरजमा करा.
नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ६ किंवा ७ नोव्हेंबरला जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता दुबार नावांवर आयोगाने लक्ष केंद्रित केले आहे.
येणाऱ्या निवडणुकीत कसे रोखणार दुबार मतदान?
आता आयाेगाने आदेश दिले आहेत की ज्यांची दुबार नावे आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जा, दोनपैकी कोणत्या ठिकाणी त्यांना मतदार म्हणून नाव हवे आहे, ते विचारा आणि उर्वरित पर्यायाच्या नावावर फुली मारा, जेणेकरून ते अन्यत्र मतदान करू शकणार नाहीत. आता बूथ पातळीवरील अधिकारी (बीएलओ) हे अशा दुबार मतदारांच्या घरी जातील. इतके करूनही कुठे दुबार नाव राहिलेच असेल तर मतदार एकाच ठिकाणी मतदान करतील असे त्यांच्याकडून लिहून घेतले जाणार आहे.
मोठ्या महापालिकांमध्ये ‘दुबार’ची संख्या अधिक
शहरी भागांमध्ये आणि त्यातही मोठ्या महापालिकांच्या शहरांमध्ये दुबार मतदारांची नोंदणी अधिक आहे. पालिकांची निवडणूक शेवटच्या टप्प्यात म्हणजे जानेवारीत होणार आहे. तोवर महापालिकांच्या शहरांमध्ये दुबार नावे हुडकून त्यांना दोन ठिकाणी मतदान करण्यापासून रोखणे शक्य होणार आहे. मात्र नगरपालिकांची निवडणूक चालू महिन्याअखेर होण्याची शक्यता लक्षात घेता तेथे कोणीही दुबार मतदान करणार नाही याची काळजी लगेच घ्यावी लागेल.