नेमके काय चुकले याचा शोध घ्या
By Admin | Updated: March 2, 2017 01:52 IST2017-03-02T01:52:46+5:302017-03-02T01:52:46+5:30
गडबड केलेली असावी, तर कोणी मोदी लाट अद्याप संपली नाही असे म्हणू लागले आहेत.

नेमके काय चुकले याचा शोध घ्या
रहाटणी : कोणी म्हणते, मतदान यंत्रात काही तरी गडबड केलेली असावी, तर कोणी मोदी लाट अद्याप संपली नाही असे म्हणू लागले आहेत. कोणी नवमतदारांचा वाढलेला मतांचा टक्का भाजपाच्या पथ्यावर पडला आहे, असा निष्कर्ष काढू लागले आहेत. तर कोणाच्या मते महापालिकेत राष्ट्रवादीच्या पराभवास गाफीलपणा नडला. महापालिकेतील सत्तांतराची अशी कारणमीमांसा होत असताना राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले नेमके काय चुकले, याचा शोध घ्यावा अशी जाणीव मतदारांनीच निवडणुकीनंतर ठिकठिकाणी सुरू असलेल्या चर्चेद्वारे दिली आहे.
गेल्या १५ वर्षांपासून महापालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. गत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्र्रेस पक्षाचे ८१ नगरसेवक निवडून आले होते. तसेच राष्ट्रवादीला संलग्न असलेले ११ अपक्ष नगरसेवक होते. बहुमताच्या जोरावर १५ वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विकासकामांचा डोंगर उभा केला होता. याच विकासकामांचे भांडवल निवडणुकीत कामी येईल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला होती. असे असताना राष्ट्रवादीला या निवडणुकीत केवळ ३६ जागा मिळाल्या; तर अवघे ३ नगरसेवक असे पक्षीय बल असलेल्या भाजपाने या निवडणुकीत महापालिकेत तब्बल ७७ नगरसेवक निवडून आणले. शहरातील नागरिकांनी मताचा कौल भाजपाच्या बाजूने का दिला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)
>कट्टर विरोधकांनी घेतली एकमेकांची गळाभेट
लोकसभा, विधानसभा आणि नुकतीच झालेली महापालिका निवडणूक अशा प्रत्येक टप्प्यावर शहरवासीयांनी येथील राजकारण जवळून पाहिले आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक, प्रतिस्पर्धी ऐनवेळी एकत्र येतात. स्वार्थासाठी पक्षनिष्ठा, विचारधारा या तत्त्वांना तिलांजली दिली जाते. वर्षानुवर्षाचे कट्टर विरोधक असलेले एकमेकांची गळाभेट घेतात. बंडखोरांनाही सन्मान मिळतो. याचा प्रत्यक्ष अनुभव गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवडमधील मतदारांना आला आहे. कोलांटउड्या कोणी, कशा मारायच्या त्या मारू द्यात, सर्वजण ज्या ठिकाणी एकत्र येतील,त्याकडे मतदारांनी लक्ष केंद्रित केले.
>राजकीय चर्चेला अर्थ नाही
ऐनवेळी पक्षांतर करणारे, एकमेकांवर आरोप करणारे सर्वजण एकाच माळेचे मणी आहेत. त्यांच्यात फरक काहीच नाही, हे मतदारांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी मतांचा कौल दिला. हे लक्षात घेतले, तर बाकी राजकीय चर्चेला काही अर्थच नाही, असा निष्कर्ष काही जाणकारांच्या चर्चेतून निघाला आहे.