एपीएमसी मार्केटला गुन्हेगारांचा विळखा
By Admin | Updated: August 15, 2016 03:39 IST2016-08-15T03:39:29+5:302016-08-15T03:39:29+5:30
आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला गुन्हेगारांचा विळखा पडला

एपीएमसी मार्केटला गुन्हेगारांचा विळखा
नामदेव मोरे,
नवी मुंबई- आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला गुन्हेगारांचा विळखा पडला आहे. गांजा, गुटखा, दारूच्या अवैध विक्रीसह खंडणी, चोरी, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सापडले आहेत. आतापर्यंत बांगलादेशी नागरिकांचे आश्रयस्थान असलेल्या मार्केटमध्ये जानेवारी २०१४ मध्ये हिजबुल मुजाहिदीनचा अतिरेकीही सापडला होता. परंतु यानंतरही येथील सुरक्षा व्यवस्थेमध्ये व प्रशासनाच्या गलथान कारभारामध्ये काहीही फरक पडलेला नाही.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वर्षाला १५ हजार कोटी रूपयांची उलाढाल होते. एक लाख नागरिकांना प्रत्यक्ष व ५ लाख नागरिकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. देशाच्या प्रत्येक राज्यातून व विदेशातून कृषी माल या मार्केटमध्ये विक्रीसाठी येतो.
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख व रोज होणारी करोडो रूपयांची उलाढाल यामुळे एपीएमसीवर गुन्हेगारी टोळ्यांनीही लक्ष केंद्रित केले आहे. नवी मुंबईमध्ये गांजा विक्रीचे सर्वात मोठे रॅकेट मार्केटमध्ये सुरू आहे. राजा, दत्तात्रय विधाते, पप्पू , राकेश यादव असे अनेक गांजा विक्रेते थेट मार्केटमध्ये विक्री करत आहेत.
महाराष्ट्रामध्ये सर्वत्र गुटखा विक्री असली तरी एपीएमसीच्या प्रत्येक टपरीवर माणिकचंदसह सर्व प्रकारचा गुटखा सहजपणे उपलब्ध असतो. भाजी मार्केट व विस्तारीत भाजी मार्केटच्या मधील रोडवर रोज पहाटे राकेश व त्याचे इतर तीन भाऊ हे बिनधास्तपणे गुटखा विकत असतात. एक भाऊ दारूविक्री करत असून उर्वरित येथे इतर व्यवसाय करणाऱ्यांकडून पैसे वसुलीचे काम करत आहेत.
फळ मार्केटमध्ये टेंपोमध्ये जुगाराचे अड्डे सुरू आहेत. चोरी, खून, दरोडे, बनावट नोटा व इतर गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना अनेक वेळा मार्केटमधून अटक केली आहे.
बाजार समितीच्या फळ व भाजी मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बांगलादेशी नागरिकांचे सर्वात मोठे आश्रयस्थान म्हणूनही एपीएमसी मार्केटची ओळख झाली आहे. पश्चिम बंगालमधून बांगलादेशी येथे कामानिमित्त येत आहेत. २००६ पासून जवळपास ४०० बांगलादेशी नागरिकांना मार्केटमधून अटक केली आहे. भरत शेळके एपीएमसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना एकाच वेळी १०० पेक्षा जास्त बांगलादेशी अटक केली होती. तीन महिन्यापूर्वीही येथून १४ बांगादेशींना अटक केली आहे. २०१२ मध्ये मुंबईमध्ये बनावट नोटा चलनात आणणारी टोळी अटक केली होती. ही टोळी एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये नकली नोटा देवून फळ खरेदी करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. परंतु यानंतर विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय कामगारांविरोधात काहीही ठोस कारवाई केली जात नाही. गुन्हेगारांनी मार्केटमध्ये आश्रय घेण्यास सुरवात केली असल्यामुळे एपीएमसीबरोबर देशाच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह आहे. अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर प्रशासन जागे होणार का असा प्रश्नही दक्ष नागरिक विचारत आहेत.
>बनावट तेल
ते चंदन तस्कर
१९ आॅक्टोबर २००६ मध्ये मसाला मार्केटमध्ये गोदरेजचा लोगो बनावट तेलाच्या बॉटलवर लावून विक्री करणारी टोळी पकडली होती. पाच जणांना अटक करून ३०० लिटर तेल जप्त केले होते. ९ डिसेंबर २०१३ मध्ये अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा नुरमोहम्मद शेख हाही एपीएमसीमध्येच कार्यरत असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. याशिवाय २७ नोव्हेंबर २०१४ मध्ये ५ कोटी रूपयांचे चंदन सापडले होते. मे २०१६ मध्ये गुजरात पोलिसांनी ट्रक चोरी करणारे आरोपी अटक करून २९ ट्रक जप्त केले होते. या आरोपींचेही एपीएमसी कनेक्शन उघड झाले होते.