प्रभागरचनेचा आराखडा अंतिम टप्प्यात

By Admin | Updated: September 5, 2016 01:24 IST2016-09-05T01:24:15+5:302016-09-05T01:24:15+5:30

महापालिकेच्या ४ सदस्यीय प्रभागरचना तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

In the final phase of Prabhakaracha plan | प्रभागरचनेचा आराखडा अंतिम टप्प्यात

प्रभागरचनेचा आराखडा अंतिम टप्प्यात


पुणे : महापालिकेच्या ४ सदस्यीय प्रभागरचना तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. संपूर्ण शहराच्या प्रभागरचनेचा आराखडा येत्या मंगळवारी विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या त्रिसदस्यीय समितीकडे सादर केला जाणार आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी पुणे महापालिकेला भेट देऊन प्रभागरचनेच्या कामाची पाहणी केली.
राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार येत्या ७ सप्टेंबर रोजी महापालिकेच्या निवडणूक विभागाला प्रभागरचनेचा अंतिम आराखडा समितीला सादर करावा लागणार आहे. त्यामुळे प्रभागरचना अंतिम करण्यासाठी निवडणूक विभागाची धांदल उडाली आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीने प्रभागरचना अंतिम करण्याचे काम सुरू आहे.
शनिवारी राज्य निवडणूक आयोगाच्या दोन अधिकाऱ्यांनी पुणे महापालिकेला भेट देऊन प्रभागरचनेच्या कामाची पाहणी केली. प्रभागरचना करताना येणाऱ्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या, अशी माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी यांनी दिली. महापालिकेच्या निवडणूक विभागाने तयार केलेला प्रभाग रचनेचा आराखडा विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीकडे जाईल. या समितीकडून प्रभागरचनेचा आढावा घेतला जाईल. त्यामध्ये योग्य त्या दुरुस्त्या करून १२ सप्टेंबर रोजी तो निवडणूक आयोगाकडे पाठविला जाणार आहे. निवडणूक आयोगाकडून २३ सप्टेंबरपर्यंत याला मान्यता दिली जाणार आहे. त्यानंतर १० ते २५ आॅक्टोबरच्या दरम्यान प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती नोंदविता येणार आहेत. ७ आॅक्टोबर रोजी आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे.
प्रभाग रचनेला उत्तर दिशेकडून सुरुवात करण्यात येऊन त्यानंतर पूर्व वळावे लागणार आहे. पूर्वेकडून पश्चिमेकड आणि शेवट दक्षिण दिशेला करण्यात यावा, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
>कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला
राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला प्रभागरचना अंतिम करण्यासाठी दिलेली मुदत संपायला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत.
आपला प्रभाग कसा असेल, याची उत्सुकता सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुक कार्यकर्त्यांना लागलेली आहे. प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर, त्यावर निवडणुकीची पुढील गणिते निश्चित होणार असल्याने याला खूप महत्त्व आले आहे.

Web Title: In the final phase of Prabhakaracha plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.