पालिकेतील ध्वजसेवेचा ‘त्यांचा’ अखेरचा स्वातंत्र्य दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2016 03:22 IST2016-08-15T03:22:24+5:302016-08-15T03:22:24+5:30
मुंबई महानगरपालिकेच्या बोरीबंदर येथील मुख्यालयातही प्रथेप्रमाणे मुंबईचे प्रथम नागरिक म्हणून महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण होईल

पालिकेतील ध्वजसेवेचा ‘त्यांचा’ अखेरचा स्वातंत्र्य दिन
प्रवीण दाभोळकर,
मुंबई- सत्तरावा स्वातंत्र्य दिन भारतभरात साजरा होत असताना, मुंबई महानगरपालिकेच्या बोरीबंदर येथील मुख्यालयातही प्रथेप्रमाणे मुंबईचे प्रथम नागरिक म्हणून महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. या वेळी परिरक्षक अरविंद विचारे हे या ध्वजाची दोरी महापौरांकडे देतील. या मुख्यालयातील तिरंगा ध्वजाची दिवसरात्र काळजी घेणाऱ्या विचारे कुटुंबीयांसाठी हा स्वातंत्र्य दिन भावनिक असणार आहे. गेली २८ वर्षे ध्वजसेवा करणारे परिरक्षक अरविंद विचारे यंदा निवृत्त होणार असल्याने, तब्बल ४५ वर्षांनंतर तिरंग्याची दोरी आता विचारे कुटुंबीयांकडे नसेल.
१२५ फूट उंचीवर असलेल्या ध्वजस्तंभावर पालिकेचा राष्ट्रध्वज सूर्योदयाला सन्मानाने चढविण्याची आणि सूर्यास्ताला उतरविण्याची जबाबदारी महापालिकेच्या परिरक्षण विभागात काम करणाऱ्या परिरक्षक म्हणून अरविंद विचारे यांच्याकडे आहे. ऊन, वारा, पाऊस किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती असली, तरीही पालिकेच्या मुख्यालयावर हा तिरंगा डौलाने फडकत असतो. राष्ट्रीय दिनी या मुख्यालयावर चार राष्ट्रीय ध्वज लावले जातात. गेली ४५ वर्षांतील कोणत्याही स्वातंत्र्य दिनी व प्रजासत्ताक दिनी विचारे कधीही गैरहजर नव्हते. हे दोन दिवस अरविंद विचारे यांच्यासाठीच नव्हे, तर या कुटुंबीयांसाठी एक सोहळाच असतो. महापालिकेच्या परिरक्षण विभागांतर्गत काम करणारे शांताराम विचारे यांनी १९७१ पासून ही जबाबदारी संभाळली, ते १९८६ साली सेवानिवृत्त झाले. त्यानंतर, त्यांचे पुत्र अरविंद विचारे यांनी आजतागायत ही जबाबदारी पार पाडत, आपल्या वडिलांचा वारसा सांभाळत आहेत. यातील १७ वर्षे शांताराम विचारे हे या तिरंग्याची काळजी घेत होते. ते सेवानिवृत्त झाल्यावर त्यांचा मुलगा अरविंद विचारे पुढील २८ वर्षे ही जबाबदारी पार पाडत आहेत. ज्या दिवशी सूर्यास्ताला राष्ट्रध्वज उतरवून शांताराम विचारे हे सेवानिवृत्त झाले, त्याच्याच दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला या राष्ट्रध्वजाची दोरी अरविंद विचारे यांच्या हातात आली ती आजतागायत. ध्वजाचा कायदा, सन्मान, निगा राखण्यात तसूभरही फरक पडणार नाही, याची काळजी विचारे पिता-पुत्रांनी घेतली.
राष्ट्रीय ध्वजापर्यंत पोहोचण्यासाठी महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरुन गोलाकार असलेल्या ५७ पायऱ्या चढून सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या काही काळ अगोदर ध्वजस्तंभापाशी जावे लागत. पंचागाच्या वेळेप्रमाणे सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळा विचारेंना पाळावी लागते. अरविंद विचारेंचे बालपणही याच इमारतीच्या आवारात गेल्याने पालिकेच्या इमारतीच्या कानाकोपऱ्याची त्यांना अचूक माहिती आहे. यामुळे महापालिकेवर आलेल्या आपत्तींच्या वेळी त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. पालिकेच्या परिरक्षण खात्यातीलच जयराम खंडमळे आणि राजेंद्र भताणे यांची सहायक म्हणून त्यांना मदत होत असते. बऱ्याचदा दोघांची सुट्टी असली किंवा गैरहजर असले, तरी अरविंद विचारे यांना कोणतीही सबब देता येत नाही. त्यामुळे सणसूद, नातेवाईक यांच्यासाठी त्यांना वेळ देता येत नाही. नियमाप्रमाणे ३१ डिसेंबर २०१६ रोजी अरविंद विचारे सेवानिवृत्त होतील. त्यानंतर, ४५ वर्षांनंतर प्रथमच परिरक्षकाची आणि राष्ट्रीय ध्वजाची जबाबदारी विचारे कुटुंबीयांकडे नसेल.
ध्वजारोहणाची जबाबदारी पार पाडताना, इतर महत्त्वाच्या इमारतींशी समन्वय ठेवावा लागतो. मुंबई महापालिकेच्या इमारतीजवळ आणखी चार इमारतींवर झेंडे फडकताना दिसतात. त्यात रेल्वे मुख्यालय, जी.पी.ओ कार्यालय, दक्षिणेकडील उच्च न्यायालय तसेच इंदिरा डॉक या चारही ठिकाणी राष्ट्रध्वज समन्वयाने एकाच वेळी चढविले जातात आणि उतरविले जातात.
>वर्षातील ३६५ दिवस ध्वजारोहण करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याची संधी या निमित्ताने गेली ४५ वर्षे आमच्या कुटुंबाकडे आहे. ही माझ्यासाठी अभिमान आणि भाग्याची गोष्ट आहे. वयाची ५८ वर्षे पूर्ण झाल्याने निवृत्तीमुळे पुढच्या स्वातंत्र्य दिनी मी इथे नसेन, पण इथल्या आठवणी कायम तशाच राहतील.
- अरविंद विचारे,
परिरक्षक, मुंबई महानगरपालिका