पानशेत भरले, मुठेला पुन्हा पूर
By Admin | Updated: August 6, 2016 00:25 IST2016-08-06T00:25:41+5:302016-08-06T00:25:41+5:30
पानशेत धरण गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच भरले असून, धरणातून सायंकाळी सात वाजता ९ हजार ५०० क्युसेक्स पाणी खडकवासला धरणात सोडण्यास सुरुवात करण्यात आली

पानशेत भरले, मुठेला पुन्हा पूर
पुणे : खडकवासला धरणसाखळीमधील पानशेत धरण गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच भरले असून, धरणातून सायंकाळी सात वाजता ९ हजार ५०० क्युसेक्स पाणी खडकवासला धरणात सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही संततधार सुरू असल्याने तब्बल ४१ हजार ७५६ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे महापालिकेसमोरील टिळक पुलाला पाणी टेकले आहे. नदीकाठावरील अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले आहे.
शुुक्रवारी सकाळीच पानशेत धरणाचा पाणीसाठा ९६ टक्क्यांच्या पुढे गेल्याने सायंकाळी पाणी सोडण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून पाटबंधारे विभागाकडून खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग वाढविला. रात्री ८ च्या सुमारास हा विसर्ग ४५ हजार क्युसेक्स करण्यात आला होता. यामुळे अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले. रात्री पाऊस कमी झाल्याने अकरा वाजल्यापासून हा विसर्ग ४० हजार इतका सुरू ठेवण्यात आला आहे. मात्र, पानशेत आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत पाऊस कायम राहिल्यास विसर्ग वाढवावा लागणार आहे. त्यामुळे पुणे शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभर पाऊस सुरूच असल्याने सायंकाळी ५ वाजता हा पाणीसाठा २५.१६ टीएमसी (८६ टक्के ) झाला आहे.
(प्रतिनिधी)
>नदीच्या पात्रातील पाणी वाढत असल्याने नदीकाठाच्या अनेक कुटुंबांनी रात्र जागून काढली. नदीपासून थोडेसे दूर असलेल्या नागरिकांनाही पाणी आपल्या घरात शिरेल काय याची भीती सतावत होती. महापालिकेच्या आत्पकालीन निवारण कक्ष तसेच अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास फोन करून सातत्याने पाणी कधी कमी होणार याची नदीकाठच्या लोकांकडून विचारणा करण्यात येत होती. पाटील इस्टेट झोपडपटटीमधील नदीकाठच्या १५० घरांमध्ये रात्री उशीरा पाणी शिरले. त्या कुटुंबांना पालिकेच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात आले.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार
गुरुवारी विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी सकाळपासून या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अवघ्या १२ तासांत पानशेत, वरसगाव आणि टेमघर या तिन्ही धरणांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ६ ते सायंकाळी ५ या कालावधीत खडकवासला ५३ मिमी, पानशेत ११५ मिमी, वरसगाव ११४ मिमी तर टेमघर धरणात ९२ मिमी पाऊस झाला आहे. या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे पाणी सोडण्यात आल्यानंतरही पाणीसाठ्यात वाढ होत असल्याचे चित्र होते.
‘खडकवासल्या’तून ४२ हजार क्युसेक्स विसर्ग
पानशेत धरणातून सायंकाळी पाणी सोडण्यात येणार असल्याने पाटबंधारे विभागाकडून सकाळपासूनच खबरदारीचा उपाय म्हणून खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. तो सकाळी १० पासून ४ हजारांवरून १० हजार क्युसेक्स करण्यात आला. तर, दुपारी २ वाजता २० हजार क्युसेक्स करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता तो तब्बल ३५ हजार करण्यात आला. दरम्यान, रात्री ४२ हजार क्युसेक्स विसर्ग करण्यात आला. तसेच रात्री अकरा वाजल्यानंतर विसर्ग ४० हजार क्युसेक्सपर्यंत करण्यात आला. दिवसभर पाणी सोडण्यात आल्यानंतर सायंकाळीही धरणात जवळपास तेवढाच पाणीसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.
>पानशेत भरले : शहर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सोमवार (दि.१)पासून सुरू झालेल्या पावसाने खडकवासला धरणसाखळीमधील पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या चारही धरणांमध्ये चांगला पाणीसाठा वाढला आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी पानशेत धरण हे ६५ टक्के भरलेले होते. या धरणाची उपयुक्त पाणीसाठवण क्षमता सुमारे १०.६५ टीएमसी असून, आज सकाळी धरणात ९.७७ टीएमसी पाणी जमा झाले होते (९२ टक्के). त्यानंतर सायंकाळी हा पाणीसाठा १० टीएमसीच्या वर गेल्याने रात्री पावसाची शक्यता लक्षात घेऊन धरणातून सायंकाळी सातनंतर सुमारे ९ हजार ५०० क्युसेक्स पाणी खडकवासला धरणात सोडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, वीजनिर्मिती केंद्रासाठीसुद्धा ६०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. दोन वर्षांत पानशेत धरण पहिल्यांदाच भरले आहे.