शेतकर्याला लाच मागणार्या तलाठी व कोतवालाविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: May 31, 2014 01:10 IST2014-05-30T20:28:53+5:302014-05-31T01:10:22+5:30
वडिलोपार्जित शेती नावावर करण्यासाठी शेतकर्याला मागीतली ५ हजार रुपयांची लाच; तलाठी व कोतवालाविरुद्ध गुन्हा दाखल

शेतकर्याला लाच मागणार्या तलाठी व कोतवालाविरुद्ध गुन्हा दाखल
अकोला : वडिलोपार्जित बारा एकर शेतीपैकी अडीच एकर शेती तक्रारकर्त्याच्या नावावर करण्यासाठी शेतकर्याला ५ हजार रुपयांची लाच मागणार्या तलाठी व कोतवालाविरुद्ध शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपींना संशय आल्याने ते फरार झाले. मूर्तिजापूर येथील तक्रारकर्त्याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या वडिलांचे नावे असलेल्या बारा एकर शेतीपैकी अडीच एकर शेती तक्रारदाराला त्याच्या नावे करावयाची असल्याने त्याने मूर्तिजापूर तलाठी कार्यालयात अर्ज केला. येथील तलाठी ऊर्मिला विश्वनाथ गव्हाळे हिने शेती नावे करण्यासाठी तक्रारदारास ५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारकर्त्याने २ हजार रुपयांची लाच दिली. उर्वरित ३ हजार रुपयांची रक्कम देणे बाकी असल्याने तलाठी ऊर्मिला गव्हाळे हिने २६ मे रोजी तक्रारकर्त्यास फोन करून ३ हजार रुपये हिरपूरचे कोतवाल देवीदास तायडे यांना देण्यास सांगितले. दरम्यान तक्रारकर्त्याने ३ हजार रुपयांची रक्कम जास्त होत असल्याचे सांगून, यातील काही रक्कम कमी करण्याची विनंती केली. त्यानुसार तलाठी ऊर्मिला गव्हाळे हिने ५00 रुपये कमी करून २५00 रुपये कोतवालाजवळ देण्याचे सांगितले. त्यापूर्वी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली आणि ते कोतवालाकडे २५00 रुपयांची रक्कम घेऊन गेले. या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला; परंतु कोतवालास संशय आल्याने त्याने लघुशंकेस जात असल्याचे कारण देत, पळ काढला. तलाठी ऊर्मिला गव्हाळे व कोतवाल देवीदास तायडे यांच्यावर कलम ७ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार ३0 मे रोजी गुन्हा दाखल केला.