खान्देशातील ५० कोटी निधी परत गेला
By Admin | Updated: March 30, 2015 02:20 IST2015-03-30T02:20:28+5:302015-03-30T02:20:28+5:30
जळगाव जिल्ह्यातील नऊ तालुक्यांंमध्ये दुष्काळसदृश स्थिती असल्याने या तालुक्यांसाठी १५७ कोटी ४२ लाख रुपये मदत निधी आला.

खान्देशातील ५० कोटी निधी परत गेला
जळगाव जिल्ह्यातील नऊ तालुक्यांंमध्ये दुष्काळसदृश स्थिती असल्याने या तालुक्यांसाठी १५७ कोटी ४२ लाख रुपये मदत निधी आला. पण यापैकी २१ कोटी ३८ लाख ५१ हजार २४५ रुपये निधी शासनाकडे परत पाठविण्यात आला आहे़ जामनेर, पारोळा, भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, पाचोरा, भडगाव, अमळनेर, चाळीसगाव या तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती होती. या तालुक्यांमधील तीन लाख ४७ हजार ४२७ हेक्टर बाधित झाले होते. सुमारे ३३ हजार शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. धुळे जिल्ह्यात सुमारे १४२ कोटी रुपयांचे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. भरपाई देताना सरकारने हेक्टरची मर्यादा घातल्याने उरणारे २२-२३ कोटी रुपये ‘सरेंडर’ होतील, असे सूत्रांनी सांगितले़ नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तीन तालुक्यांसाठी शासनाने ३३ कोटी ३० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचा फायदा ९९ हजार ७६६ शेतकऱ्यांना झाला आहे. नंदुरबारसह नवापूर आणि अक्कलकुवा या तालुक्यांतील ५०९ गावांना दुष्काळी स्थिती होती़ या तालुक्यांसाठी ३३ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मिळाला होता. आतापर्यंत ३२ कोटी १० लाख रुपयांचा निधी ९२ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे़ तर ९२ हजारांपैकी काही शेतकऱ्यांची नावे यादीत चुकीची प्रसिद्ध झाल्याने आणि काहींचे बँक खाते नंबर चुकीचे गेल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही़ काही शेतकऱ्यांनी पुरावे दिल्यानंतरही त्यांना चकरा माराव्या लागत आहेत.