महिलावर्ग करतो उत्सवाचे मॅनेजमेंट
By Admin | Updated: August 15, 2016 03:19 IST2016-08-15T03:19:28+5:302016-08-15T03:19:28+5:30
घराच्या चार भिंती ओलांडून महिलांनी समाजात विविध क्षेत्रात स्थान मिळविले.

महिलावर्ग करतो उत्सवाचे मॅनेजमेंट
रामेश्वर जगदाळे,
मुंबई- घराच्या चार भिंती ओलांडून महिलांनी समाजात विविध क्षेत्रात स्थान मिळविले. किंबहुना बऱ्याचशा क्षेत्रात महिला पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे आहेत. याच उक्तीचा आदर्श घेत काळाचौकी येथील आंबेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पुढाकार घेत उत्सवाच्या मॅनेजमेंटची सूत्रे महिलांच्या हाती सोपविली आहेत.
१९७० साली स्थापन झालेल्या या मंडळांचे यंदा ४७ वे वर्ष आहे. पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याकडे या मंडळाचा कल असतो. त्यामुळे दरवर्षी या मंडळाच्या वतीने प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी विशेष उपक्रमांची रेलचेल दिसून येते.
>कोणत्याही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मॅनेजमेंट कायम पुरुषांकडे असते. मात्र आमच्या मंडळात हीच जबाबदारी महिलांचा समूह सांभाळतो. परंतु, या सगळ््यात पुरुष सहकारीही तितकीच मदत करतात. सगळ््यांच्या एकजूटीतून उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यावर अधिक भर असतो.
- आकांक्षा गावडे,
महिला अध्यक्षा
>इकोफ्रेंडली सजावट
वाढते प्रदूषण आणि आरास करण्यासाठी थर्माकोलचा होणारा वापर टाळण्यासाठी मंडळाच्या वतीने जास्तीत जास्त इकोफ्रेंडली सजावट करण्यात येते. त्यात मग कपडे, कागद यांचा अधिकाधिक वापर करण्यात येतो. शिवाय, सजावटींच्या वस्तूंचा पुनर्वापर होईल याची दक्षताही मंडळाकडून घेण्यात येते.
>शिस्तबद्ध मंडळाचा सन्मान
गेल्या काही वर्षात डीजेचा दणदणाट असो वा गणेशभक्तांची ओसंडून वाहणारी गर्दी या प्रकारांमुळे गणेश मंडळांवर टीकाही होऊ लागली. मात्र स्पर्धेच्या भाऊगर्दीत या मंडळाने २००८ आणि २००९ अशा सलग दोन वर्षी काळाचौकी पोलीस ठाण्याकडून ‘शिस्तबद्ध मंडळा’चा सन्मान मिळविला.
>पारंपरिक खेळांची जोपासना
मंडळाच्या वतीने गणेशोत्सवादरम्यान रात्रभर येथील उत्साही महिला पारंपरिक खेळांचे सादरीकरण करतात. त्यात फुगड्या, झिम्मा अशा लोप पावत चाललेल्या खेळांची जोपासना केली जाते.
>सुवर्ण महोत्सवासाठी कार्यकर्त्यांची धडपड
लवकरच मंडळांचे सुवर्णमहोत्सवी वर्ष येणार आहे, त्यासाठी येणारा आर्थिक भार हेरुन स्थानिकांनी स्वच्छेने निधी उभारण्याचे ठरविले आहे. त्यासाठी यंदापासून एक रुपयाची मदतही स्विकारण्याची तयारी असल्याचे खजिनदार तेजस मोजाड यांनी सांगितले.
>वूमन ब्रिगेड
गणेशोत्सवादरम्यान निघणाऱ्या मिरवुणकांमध्येही येथील विविध वयातील महिलांची आघाडी दिसून येते. शिवाय, या मिरवुणकांचेही व्यवस्थापन तरुणी आणि महिलांच्या खांद्यावर असते. मात्र तरीही ही वूमन ब्रिगेड कोणतेच भय न बाळगता हे सर्व कार्य पार पाडते.