आर्थिक व्यवहारातून महिलेला मारहाण

By Admin | Updated: June 28, 2016 02:25 IST2016-06-28T02:25:32+5:302016-06-28T02:25:32+5:30

व्यावसायिक गाळा भाड्याने घेण्यावरुन महिलेला शिवीगाळ करत मारहाण झाल्याचा प्रकार खैरणेत घडला आहे.

Female assault by financial transaction | आर्थिक व्यवहारातून महिलेला मारहाण

आर्थिक व्यवहारातून महिलेला मारहाण


नवी मुंबई : व्यावसायिक गाळा भाड्याने घेण्यावरुन महिलेला शिवीगाळ करत मारहाण झाल्याचा प्रकार खैरणेत घडला आहे. याप्रकरणी रिजवान पटेल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पटेलवर यापूर्वी देखील गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावर तडीपारीच्या कारवाईला पोलिसांनी सुरवात केली आहे.
वाशीत राहणाऱ्या महिलेने रिजवान पटेलकडून व्यावसायिक गाळा भाड्याने घेतला होता. याकरिता सदर महिलेने पटेल याला साडेतीन लाख रुपये दिले होते. तीन लाख रुपये भाड्याच्या कराराचे तर ५० हजार रुपये गाळ्यातील उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या निमित्ताने पटेलने घेतले होते. मात्र पैसे घेतल्यानंतरही त्यांना पटेलकडून कसलाही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर त्यांनी दिलेली रक्कम परत मागितली असता पटेलने त्यांना धनादेश दिला. परंतु हा धनादेश न वटल्यामुळे सदर महिलेचे कुटुंब जाब विचारायला गेले होते. यावेळी रिजवान याने गलिच्छ शिवीगाळ करत धक्काबुकी केल्याची तक्रार सदर महिलेने कोपरखैरणे पोलिसांकडे केली आहे.
रिजवानवर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल असून अवैधरीत्या गोमांस विक्री प्रकरणी देखील त्याचा सहभाग आढळून आला होता. त्याच्यावर दाखल असलेल्या अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची दखल घेत तत्कालीन उपआयुक्त शहाजी उमाप यांनी त्याला तडीपारीच्या कारवाईला सुरवात केली होती. याकरिता त्याला दोनदा कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. त्यापैकी एका नोटीसला त्याने प्रतिसाद दिला असून पोलिसांनी त्याच्या कारणाबाबत असमाधान व्यक्त केलेले आहे. यानुसार विद्यमान उपआयुक्त प्रशांत खैरे यांनी नुकतीच त्याला तिसरी नोटीस बजावली असून लवकरच त्याच्यावर सक्त कारवाईची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
रिजवान याच्याविरोधात पोलिसांकडे येणाऱ्या तक्रारींची दखल घेतली जावू नये व त्याला अभय मिळावे याकरिता पोलिसांवर राजकीय दबाव येत आहे. एका राजकीय व्यक्तीच्या माध्यमातून गृहमंत्रालयातून पोलिसांवर हा दबाव येत असल्याचे सूत्रांकडून समजते. यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाशी संबंध नसतानाही केवळ गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या मंत्र्याविरोधात पोलिसांमध्ये नाराजी पसरली आहे.

Web Title: Female assault by financial transaction