विधिमंडळ पुरस्कार हा आदर्शाचा सत्कार : विजय दर्डा
By Admin | Updated: August 5, 2016 05:10 IST2016-08-05T05:10:40+5:302016-08-05T05:10:40+5:30
लोकमतने विधिमंडळ पुरस्कार सुरू केला असून एक प्रकारे हा विधिमंडळातील आदर्शांचाच सत्कार असल्याची भावना लोकमतचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केली.

विधिमंडळ पुरस्कार हा आदर्शाचा सत्कार : विजय दर्डा
मुंबई : विधिमंडळात गोंधळापेक्षा जनतेच्या आशा आकांक्षांना मूर्त स्वरुप कसे येईल याचा विचार व्हावा, अभ्यासपूर्ण भाषणे व्हावीत, विचारांचे आदानप्रदान होण्यास प्रोत्साहन मिळावे या भूमिकेतून लोकमतने विधिमंडळ पुरस्कार सुरू केला असून एक प्रकारे हा विधिमंडळातील आदर्शांचाच सत्कार असल्याची भावना लोकमतचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केली.
लोकमत विधिमंडळ पुरस्कार वितरण सोहळ्याचे स्वागतपर प्रास्ताविक भाषण करताना विजय दर्डा म्हणाले की, संसद आणि विधीमंडळाने लोककल्याणाचे मार्ग प्रशस्त करण्यासाठी अनेक महत्वाचे कायदे करण्याचे काम केले आहे. परंतु अलीकडच्या काळात संसद असो की देशभरातील विधिमंडळे असोत, यात विविध अंगाने चर्चा, सकस वादविवाद न होता सभागृह बंद पाडणे, चर्चा न होणे व गोंधळात विधेयके मंजूर करुन घेणे असे प्रकार सातत्याने घडताना दिसतात.
समाजधुरीणांना, विचारवंतांना जशी याविषयी काळजी आहे तसेच कोट्यवधी जनतेला अपेक्षाभंगाचे दु:ख आहे. कारण सुसह्य जीवन जगण्यासाठी, अन्न-वस्त्र-निवारा
या मुलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी जनतेला याच सभागृहांकडून अपेक्षा आहेत. बेचैन असलेल्या तरुण पिढीचा सभागृहांविषयीचा आदर कमी होऊ नये असे आमचे प्रामाणिक मत आहे.
सातत्याने निर्भीड, निष्पक्ष आणि लोकाभिमुख पत्रकारिता करणारा लोकमत दलित, पीडित, शोषित, उपेक्षितांच्या बाजूने लढत राहिलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांशी आणि नंतरच्या काळात स्वातंत्र्य मिळालेल्यांसाठी लढण्याचे व्रत लोकमतने कायम जपले. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही जनतेच्या आशा-आकांक्षांची परिपूर्ती करणाऱ्या आदर्श प्रतिनिधींचे कार्य जनतेत नेण्यासाठी ‘‘लोकमत विधीमंडळ पुरस्कार’’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
विधानसभेचे माजी अध्यक्ष व थोर विचारवंत बाळासाहेब भारदे यांचे वाक्य उद्धृत करून विजय दर्डा म्हणाले की, तोंड सांभाळून बोल कसा लावावा, वैर सोडून वार कसा करावा, नरम होऊन वर्म कसे भेदावे, दुजाभाव असून बंधूभाव कसा ठेवावा, अल्पमताने बहुमताला व बहुमताने लोकमताला कसा साद प्रतिसाद द्यावा आणि ही सर्व संधाने बांधण्यात लोकसेवेचे अनुसंधान कसे सुटू नये,
या सर्व गोष्टीेंचे दक्षतापूर्वक परिपालन म्हणजेच वैधानिक कार्य आणि
या वैधानिक कार्याचा आज
सत्कार होत असल्याचा लोकमत परिवाराला अपूर्व आनंद वाटत आहे. (विशेष प्रतिनिधी)
>माझे वडील आणि लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा हे दीर्घकाळ विधान परिषदेचे सदस्य होते आणि अनेक वर्षे मंत्रीदेखील राहिले. माझे बंधू राजेंद्र दर्डा हे १५ वर्षे आमदार होते आणि दोनवेळा मंत्रीदेखील राहिले.मी स्वत: १८ वर्षे राज्यसभेचा सदस्य राहिलो. संसदपटूंच्या योगदानाचे जे महत्त्व या प्रवासात कळले तो प्रवासदेखील या पुरस्कारामागची प्रेरणा असल्याचे विजय दर्डा म्हणाले.कुठल्याही एका राज्यात एकाच वृत्तपत्राचा खप २० लाखांपेक्षा अधिक असल्याचे लोकमत हे देशातील एकमेव उदाहरण असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख विजय दर्डा यांनी यावेळी केला.