रिक्षातून फिरताना कपाळमोक्षाचीच भीती
By Admin | Updated: August 1, 2016 01:06 IST2016-08-01T01:06:56+5:302016-08-01T01:06:56+5:30
ज्या दिवशी रिक्षामध्ये बसून लिपस्टिक सहजपणे लावता येईल त्या दिवशी शहरातील सर्व खड्डे बुजले म्हणून समजावे

रिक्षातून फिरताना कपाळमोक्षाचीच भीती
प्राची मानकर / प्रीती जाधव,
पुणे- ‘ज्या दिवशी रिक्षामध्ये बसून लिपस्टिक सहजपणे लावता येईल त्या दिवशी शहरातील सर्व खड्डे बुजले म्हणून समजावे......!
पुण्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर एका पुणेकर तरुणीचा हा मेसेज सध्या फिरतोय. खरोखरच काय परिस्थिती आहे, यासाठी ‘लोकमत टीम’ने रिक्षातून पुण्यातील रस्त्यांवरून प्रवास केला. या वेळी लिपस्टिक लावणेच काय, थोडेसे जरी दुर्लक्ष झाले तरी कपाळमोक्षच व्हायची भीती, अशी पुण्यातील रस्त्यांची स्थिती असल्याचे विदारक चित्र दिसून आले.
लोकमतच्या प्रतिनिधींनी पुण्यातील मध्यवस्तीत पाहणी केली. या रस्त्यावरून रिक्षात जाताना लिपस्टिक लावण्याचा प्रयत्न करायचा आणि ठराविक अंतरावर येणाऱ्या खड्ड्यांमुळे धक्के बसून ती तोंडावरच फासली जाण्याचीच तरुणींना भीती असा अनुभव आला. अगदी काही दिवस पाऊस पडला तर ही अवस्था झालेली; मग पुढच्या दोन महिन्यांत जास्त पावसाने खड्ड्यांतच रस्ता शोधावा लागायचा...
लॉ कॉलेज रस्त्यावरून रिक्षाने प्रवासास सुरुवात केली. रस्त्याच्या मधोमध छोटे-छोटे खड्डे त्यामुळे चालकाने कडेने रिक्षा नेण्याचा प्रयत्न केल्यावर तर घसरण्याचाच धोका. सेनापती बापट रस्त्यावर सिम्बायोसिसच्या सिग्नलजवळ कौतुकाने पेव्हिंग ब्लॉकचा रस्ता केला आहे. उतार असल्याने येथे घसरण्याची भीती आहे. याच चौकातून पुढे गेल्यावर चतु:शृंगी मंदिराच्या समोर रस्ता खोदून ठेवलेला आहे. आयसीसी टॉवर संपल्यानंतर पुढे ड्रेनेजचे चेंबर रस्त्यातच आले आहे.
रात्रीच्या वेळी याचा
अंदाज आला नाही तर अपघाताची भीती. रस्ता काही ठिकाणी
खूपच चांगला असल्याने
वाहनचालक वेगाने जातात. पण मध्येच येणाऱ्या अडथळ्यांमुळे अपघाताची भीती असते. मॅरिएट हॉटेलच्या चौकात रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले दिसतात.
येथून पुणे विद्यापीठाच्या दिशेने मॉडर्न हायस्कूलसमोर ड्रेनेज चेंबरच रस्त्यावर. वाहनचालकाची एखादी चूक झाली तरी त्यावरून गाडी उडण्याचा धोका. या ठिकाणी खड्डेच खड्डे. तेही पावसाच्या पाण्यामुळे भरलेले. त्यामुळे गाडीचे चाक पाण्यात पडून हादरा बसत नाही, तोपर्यंत खड्डा असल्याचे समजतच नाही. येथून औंध, पाषाण आणि बाणेर या स्मार्ट सिटीकडे जाणारे रस्ते अगदी चकचकीत आहेत. विद्यापीठ चौकातून उड्डाणपुलापर्यंत पेव्हिंग ब्लॉकचा रस्ता असल्याने गाडीचा बॅलन्स बिघडतो. शिवाजीनगरच्या दिशेने रस्त्याने पुढे गेल्यावर ई-स्क्वेअर चौकापासून शिवाजीनगरपर्यंत रस्ता चांगला आहे. मात्र, पुढे मॉडर्न कॅफेच्या समोर पुन्हा खड्डे सुरू होतात.
शिवाजी रस्त्यावर अनेक ठिकाणी चेंबर फुटलेले आहेत. यामुळे येथून वाहन चालविणे अवघड. खडक पोलीस ठाण्यासमोर रस्त्यावर वाळूचे ढीग असल्याने वाहनचालक घसरण्याची भीती आहे. स्वारगेटकडून शंकरशेठ रस्त्याने जाताना उड्डाणपुलाच्या अगोदर खड्ड्यांचे जणू साम्राज्यच. त्याचबरोबर जुजबी मलमपट्टी करण्यासाठी आणलेली खडी बाजूलाच पडलेली. त्याच चेंबरची उघडी पडलेली झाकणे. राष्ट्रीय महामार्ग असलेल्या रस्त्याची ही अवस्था आहे. या ठिकाणी फुटपाथवरही झाडाच्या फांद्या पडलेल्या आहेत.
शनिवारवाड्यासमोर तर रस्त्याला भेगाच पडलेल्या दिसल्या. शनिवारवाड्यावरून पुढे गेल्यावर लालमहालच्या समोर रस्त्यावर विटांचा ढीग पडलेला होता. अरुंद रस्त्यावरून वाहने पुढे दामटण्याच्या नादात येथे वाहतूककोंडी होत होती. वसंत थिएटरजवळही रस्ता खडबडीत. पुण्याचे मानचिन्ह मानले जाणाऱ्या दगडूशेठ गणपती मंदिरासमोर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे. रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, अनेक भागात त्यामुळे वाहतूककोंडीही होत आहे.
सेव्हन लव्हज चौकातून टिंबर मार्केटकडील रस्त्याची तर पूर्ण दुरवस्था झालेली आहे. त्यातच अनेक ठिकाणी खडी उघडी पडल्याने रस्ता धोकादायक झाला आहे. मुळातच रस्ता छोटा आणि दुतर्फा उभ्या टेम्पोमुळे वाहतूककोंडी होत होती. भवानी पेठेमध्ये रस्त्याच्या कडेला दगड पडलेले. मध्येच डिव्हायडर तुटलेले. त्यामुळे रिक्षा वेडीवाकडी वळणे घेत हेलकावे खात होती. याच रस्त्यावर रास्ता पेठेत अनेक चेंबर्स रस्त्यावर आहेत. त्यामध्ये पाणी साचले असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. आंबेडकर चौकातून जाताना रस्त्याच्या बाजूला खडी पडलेली दिसते. गणेश पेठेत तर रस्त्यावर खड्डेच खड्डे. तेही सगळ्या प्रकारचे. येथून जाताना सावरून बसले नाही तर रिक्षातून बाहेरच फेकले जाण्याची भीती.