हल्ल्याच्या भीतीने बिबट्याशी वैर नको

By Admin | Updated: November 24, 2014 23:13 IST2014-11-24T21:27:42+5:302014-11-24T23:13:54+5:30

प्रकाश आमटे : उभ्या राहिलेल्या व्यक्तीला धोका नाही; माणसांचे बोलणे ऐकूनही ‘तो’ दूर जातो

Fear of attack should not be hostile to leopard | हल्ल्याच्या भीतीने बिबट्याशी वैर नको

हल्ल्याच्या भीतीने बिबट्याशी वैर नको

राजीव मुळ्ये- सातारा  --बिबट्या माणसावर सहसा हल्ला करीत नाही. तो आपल्यावर हल्ला करेलच, असे गृहित धरून त्याच्याशी वैर करू नका, असा कानमंत्र ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी पश्चिम घाटातील ग्रामस्थांना दिला आहे. विकासाची प्रक्रिया पर्यावरणाचे संतुलन राखणारी असावी, असेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेले डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांनी ‘लोकमत’ला विविध मुद्द्यांवर अनुभवाचे बोल सांगितले. परिसरातील अनेक गावांमध्ये बिबट्याचे दर्शन नव्यानेच होऊ लागले आहे. उसाच्या शेतात दबा धरून बसणारा बिबट्या कधी प्रवासी वाहनावर उडी घेताना, तर कधी शेतात मृतावस्थेत आढळून येत असल्याने अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याविषयी बोलते केले असता डॉ. आमटे म्हणाले, ‘बिबट्या माणसावर सहसा हल्ला करीत नाही. खाली वाकलेली व्यक्ती, शौचाला बसलेली व्यक्ती अशी त्याच्यापेक्षा कमी उंचीची आकृती दिसली, तरच तो हल्ला करण्याची शक्यता असते. एरवी माणसाच्या जवळपास तो फिरकत नाही. भीती असणाऱ्या गावांतील ग्रामस्थ केवळ गप्पा मारत शेतात गेले, तरी त्या आवाजाने बिबट्या दूर राहील.’
पाळीव जनावरांवरील हल्ले वाढत असल्याने बिबट्या शेतकऱ्यांना शत्रू वाटू लागला आहे, हे निदर्शनास आणून देताच त्यांनी अनेक उपाययोजना सुचविल्या. ‘पाळीव प्राण्याची शिकार वन्यजीवांकडून झाल्यास नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे, ती सुटसुटीत करायला हवी. पंचनामा आणि भरपाई तातडीने मिळायला हवी. घटना वनखात्याच्या हद्दीत घडली की गावठाणात, असे घोळ न घालता भरपाई मिळू लागल्यास शेतकरी बिबट्याला शत्रू मानणार नाहीत,’ असे ते म्हणाले.

‘सोशल वाघां’ना सल्ला
वाघ, बिबटे आणि इतर वन्यजीवांचे फोटो आणि त्यांचा आढळ असलेली ठिकाणे हल्ली सोशल मीडियावर सर्रास फिरत असतात. अशा ‘सोशल वाघां’ना डॉ. आमटे यांनी सबुरीचा सल्ला दिला. ‘खोटी माहिती, फोटो प्रसिद्ध करणे तर टाळाच; परंतु खरोखर एखादा वन्यजीव कुठे आढळला असेल, तरी त्याचा फोटो ‘सोशल मीडिया’वर टाकू नका. अशा माहितीमुळे शिकारी सावध होण्याचा आणि दुर्मिळ वन्यजीवांची संख्या आणखी रोडावण्याचा धोका आहे,’ असे ते म्हणाले.

घातक प्रकल्पांना विरोध हवा
गोंदिया जिल्ह्यात वनजमिनीत होऊ घातलेला औष्णिक ऊर्जा प्रकल्प, मुळशी तालुक्यात होऊ घातलेले आणखी एक खासगी हिलस्टेशन अशा प्रकल्पांकडे लक्ष वेधले असता, ‘निसर्गरक्षण आणि विकास या प्रक्रिया हातात हात घालून व्हायला हव्यात,’ असे मत डॉ. आमटे यांनी व्यक्त केले. ‘घातक प्रकल्पांना स्थानिकांनी आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी विरोध करावा. दुर्दैवाने, आर्थिक हितसंबंध प्रत्येक वेळी प्रबळ ठरतात आणि विकासप्रक्रियेत पर्यावरणाला जणू स्थानच नाही, असे वातावरण निर्माण केले जाते. ही प्रक्रिया योग्य नाही,’ असे ते म्हणाले.

Web Title: Fear of attack should not be hostile to leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.