जन्मदात्या बापाने केली तीन लहान मुलांची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:09 IST2018-05-09T22:09:48+5:302018-05-09T22:09:48+5:30
या घटनेतील तिन्ही मुले अल्पवयीन असल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
_201707279.jpg)
जन्मदात्या बापाने केली तीन लहान मुलांची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न फसला
अकोला: बोरगाव येथील धोतर्डी परिसरात बुधवारी वडिलांनी आपल्या तीन लहान मुलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर वडिलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न अपयशी ठरला. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे.
आज संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेतील तिन्ही मुले अल्पवयीन असल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. अजय विष्णू इंगळे (17), मनोज विष्णू इंगळे (16), शिवानी विष्णू इंगळे (15), अशी या लहा मुलांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू इंगळे यांनी आधी विष पाजून मुलांना ठार मारण्याचा प्रयत्न केला असावा. मात्र, त्याचा फारसा परिणाम न झाल्याने विष्णू इंगळे यांनी दोन मुलांना शॉक देऊन ठार केले. तर एकाच्या डोक्यात घरातील वरवंटा घालून त्याला ठार मारले. त्यानंतर विष्णू इंगळे यांनी शॉक आणि गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. इतके करूनही जीव जात नसल्याने विष्णू इंगळे यांनी शरीरावर धारदार शस्त्राने वार करून घेतले. परंतु, त्यांचे हे सर्व प्रयत्न फसले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, नागरिकांनी रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्यामुळे मुलांचे प्राण गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. विष्णू इंगळे यांनी हे कृत्य का केले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.